बेवारस सुटकेस आढळून आल्याने खळबळ; बॉम्बशोध पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:42 PM2019-07-27T12:42:26+5:302019-07-27T12:42:45+5:30
अकोला: गांधी रोडवरील एका दुकानाच्या बाजूला बेवारस सुटकेस सोडून एक महिला पसार झाली. बेवारस सुटकेमुळे गांधी रोडवर एकच खळबळ उडाली.
अकोला: गांधी रोडवरील एका दुकानाच्या बाजूला बेवारस सुटकेस सोडून एक महिला पसार झाली. बेवारस सुटकेमुळे गांधी रोडवर एकच खळबळ उडाली. सुटकेसमध्ये स्फोटक पदार्थ तर नाही ना, असा संशय परिसरातील दुकानदार व नागरिकांना आल्यामुळे त्यांनी तातडीने कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॉम्बशोध पथकाला पाचारण केले. पथकाने घटनास्थळ गाठून सुटकेसची तपासणी केली असता, ती रिकामी असल्याचे दिसून आले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या गांधी रोडवरील एका अगरबत्ती व सुगंधित भंडार दुकानाच्या बाजूला दुपारी १ वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला हातात मोठी सुटकेस घेऊन आली. या ठिकाणी काहीवेळ घुटमळत होती. त्यानंतर तिने दुकानाच्या बाजूला सुटकेस ठेवली आणि घटनास्थळावरून पसार झाली. बेवारस सुटकेस कोण ठेवून गेले, याची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. बेवारस सुटकेसमध्ये स्फोटक पदार्थ असण्याची शक्यता लक्षात घेता, श्याम डोंगरे, शंकरराव अडगावकर यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, बॉम्बशोध पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बॉम्बशोध पथकाने सुटकेसची पाहणी केली आणि सुटकेस उघडून बघितली. त्यात काहीच आढळून आले नाही. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. अनोळखी महिलेने खोडसाळ प्रकार करण्याच्या दृष्टिकोनातून ही कृती केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. सुटकेसची तपासणी पोलीस उपनिरीक्षक परदेशसिंह शिसोदे, मोहन फरकाडे, एजाज खान, प्रदीप पिंजरकर, बहाद्दूर सिरसाट व संदीप कडेल यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)