एसडीओ मोहिते यांची संवेदनशीलता, निराधार दाम्पत्याला मिळणार मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:36+5:302021-03-13T04:33:36+5:30
एसडीओ मोहिते यांच्यातील माणुसकी, संवेदनशीलतेचे दर्शन मूर्तिजापूरकरांना ८ मार्च रोजी अनुभवायला मिळाले. दुसऱ्या सत्रातील कोरोनाचे रुग्ण शोधण्याचे कार्य ...
एसडीओ मोहिते यांच्यातील माणुसकी, संवेदनशीलतेचे दर्शन मूर्तिजापूरकरांना ८ मार्च रोजी अनुभवायला मिळाले. दुसऱ्या सत्रातील कोरोनाचे रुग्ण शोधण्याचे कार्य प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. स्थानिक स्टेशन विभागातील जे. बी. हिंदी विद्यालयात ५ मार्चपासून व्यापारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया उपविभागीय अधिकारी अभयसिंंह मोहिते व नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ८ मार्च रोजी या ठिकाणी दुपारी उपविभागीय अधिकारी मोहिते यांनी भेट दिली. यावेळी मैदानावर झोपलेली एक वृद्ध व्यक्ती त्यांना दिसून आली. या व्यक्तीने केवळ पॅन्ट परिधान केलेली होती. व्यक्तीची प्रकृती बरी नसल्याचे मोहिते यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जाऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी वृद्ध व्यक्तीने पाणावलेल्या डोळ्यांनी आपली व्यथा सांगितली. मूर्तिजापूर येथील नवीन घरकुलामध्ये राहत असून, पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले. या व्यक्तीचे नाव मधुसूदन गिरी (वय ६७) व त्यांची पत्नी वत्सलाबाई गिरी (६३) आहे. हे दाम्पत्य कोरोना चाचणीसाठी आले होते. त्यांची कर्मकहाणी ऐकून एसडीओ मोहिते यांचे मन हेलावून गेले. त्यांनी तातडीने ऑटो रिक्षा बोलावून या दाम्पत्याला शंभर देऊन घरी पोहोचविले. एवढेच नाहीतर तलाठी वैभव राऊत यांना त्वरित घटनास्थळावर बोलावून या दाम्पत्याला महिन्याला आर्थिक मदत मिळावी, यासाठी श्रावणबाळ योजनेअंतर्गत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल महिन्यापासून निराधार दाम्पत्याला मानधन सुरू करण्याचे निर्देश दिले. एसडीओ मोहिते यांच्या पुढाकाराने एका वृद्ध दाम्पत्याला आर्थिक मदत झाली. एसडीओ मोहिते यांच्यातील मानवता, संवेदनशील व्यक्तिमत्त्व प्रथमच मूर्तिजापूरकरांना अनुभवायला मिळाले.