वैद्यकीय तपासणीअभावी चिमुकल्यांमधील गंभीर आजार लपलेलेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:23+5:302021-05-21T04:19:23+5:30
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत दरवर्षी अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये शेकडो बालकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. या वैद्यकीय तपासणीच्या ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत दरवर्षी अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये शेकडो बालकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. या वैद्यकीय तपासणीच्या माध्यमातून चिमुकल्यांमधील हृदयरोग, नेत्ररोग, हर्णिया यासह इतर गंभीर स्वरूपाच्या आजारांचे निदान केले जाते. आजाराचे निदान झालेल्या बालरुग्णांवर अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या आधारे नि:शुल्क शस्त्रक्रिया आणि औषधोपचार केले जातात. मात्र, कोरोनामुळे मागील वर्षभरापासून हा कार्यक्रम ठप्प पडला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हृदयरोगाचे निदान झालेल्या बालकांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत, तर सलग दुसऱ्या वर्षीही नव्याने बालकांच्या वैद्यकीय तपासण्या झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक चिमुकल्यांमधील गंभीर आजारांचे निदानही होऊ शकले नाही.
गरीब कुटुंबांना बसला फटका
आरबीएसके अंतर्गत प्रामुख्याने गरीब कुटुंबातील चिमुकल्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जाते. ज्या कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत आहे, अशा कुटुंबांना चिमुकल्यांच्या वैद्यकीय तपासण्या, निदान झाल्यास त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च करणेही शक्य नसते. त्यामुळे अशा कुटुंबांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोठा दिलासा देणारा आहे. मात्र, कोरोनामुळे हा कार्यक्रम ठप्प असल्याने गरीब कुटुंबातील बालकांच्या वैद्यकीय तपासण्याही होऊ शकल्या नाहीत.
आरबीएसके डॉक्टर कोविड रुग्णांच्या सेवेत
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी गत वर्षभरापासून कोविड रुग्णांच्या सेवेत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये आरबीएसके अंतर्गत कार्यरत डॉक्टर आणि इतर कर्मचारी व्यस्त आहेत.
या शस्त्रक्रियाही रखडल्या
हृदयविकार
हर्निया
हायड्रोसील
डोळ्यांचा तिरळेपणा
वर्ष - हृदय शस्त्रक्रिया
२०१९ - ५१
२०२० - २८
२०२१ - ००
‘आरबीएसके’अंतर्गत दरवर्षी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयविकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या बालकांमध्ये आजाराचे निदान करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात, मात्र काेरोनामुळे शाळा बंद असल्याने तपासण्या शक्य नाहीत. असे असले तरी चिमुकल्यांना काही त्रास असल्यास त्यांच्यावर आरबीएसके अंतर्गत वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आरोग्य विषयक समस्या आढळताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.