अकोला जिल्ह्यात आजपासून ‘सेरो’ सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:20 PM2020-09-07T12:20:32+5:302020-09-07T12:20:55+5:30
सोमवारी बाळापूर, वाडेगाव व हातरुण या तीन ठिकाणी रक्त नमुने घेतले जाणार आहेत.
अकोला : जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी सोमवार, ७ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील विशिष्ट भागात सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात सर्वेक्षण होणार असून, सोमवारी बाळापूर, वाडेगाव व हातरुण या तीन ठिकाणी रक्त नमुने घेतले जाणार आहेत.
जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविडचा संसर्ग पोहोचला, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरीरात जैवप्रतिकारशक्ती तयार झाली, त्यातून समूहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही, यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळणार आहे. असे सर्वेक्षण भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशात सध्या ८० जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातही हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली असून, प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सोमवार, ७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची चमू निश्चित केलेल्या गावांमध्ये जाणार असून, ही चमू प्रत्येक घरातील एका व्यक्तीचे रक्त नमुने घेणार आहे.
लाखामागे १०० जणांचे नमुने घेणार!
त्यासाठी १ लाखामागे १०० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले जाईल. शहरी भागातून १,४०० रक्त नमुने तर ग्रामीण भागातून १,४०० असे एकूण २,८०० रक्त नमुने घेण्यात येणार आहे. चाचण्या करण्यासाठी ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही अशा लोकांच्या रक्ताचे नमुने वेगवेगळ्या समूहातून घेण्यात येतील. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी, ग्रामीण, अतिजोखमीचे व्यक्ती, विविध वयोगटातील व्यक्ती याप्रमाणे विविध गटांमधील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने आरोग्य यंत्रणेमार्फत संकलित करून चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमधून त्या-त्या व्यक्तींच्या शरीरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळणार आहे.