सेरोलॉजिकल सर्व्हे : अकोला जिल्ह्यात शंभरपैकी १५ व्यक्तींना होऊन गेली कोरोनाची लागण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 07:19 PM2020-10-03T19:19:30+5:302020-10-03T19:23:30+5:30
Serological Survey: ४५१ म्हणजेच १५.१६ टक्के रक्त नमुन्यांमध्ये अॅन्टीबॉडी आढळून आली.
अकोला: जिल्ह्यात सरासरी शंभर व्यक्तींपैकी १५ जणांना कोरोना होऊन गेल्याची माहिती ‘सीरो’ सर्व्हेक्षणातून उघडकीस आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात ७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत ‘सीरो’ सर्व्हेक्षण करण्यात आले होते.
कोरोनाबाधित बहुतांश रुग्णांमध्ये कुठल्याच प्रकारचे किंवा सौम्य लक्षणे आढळून आलीत. त्यामुळे अनेकांना कोरोना होऊन गेला या बद्दल माहिती देखील नाही. त्यामुळे जिल्ह्यात किती लोकांना कोरोना होऊन गेला याचा अंदाज यावा, या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत ‘सीरो’ सर्व्हेक्षण करण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील २,९७५ व्यक्तींचे नमुने संकलित करण्यात आले होते. ज्या व्यक्तींना आधीच कोरोनाची लागण होऊन गेली, अशा व्यक्तींचा यामध्ये समावेश नव्हता. संकलीत रक्तनमुन्यांमध्ये शहरी भागातून ११०५, तर ग्रामीण भागातून १९७० रक्त नमुने संकलित करण्यात आले होते. कोविड आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याने सर्व्हेक्षणामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार आदि गटातून ६३५ रक्त नमुने संकलीत करण्यात आले होते. त्यानंतर सर्वच रक्त नमुण्यांमधून कीती रक्त नमुन्यांमध्ये कोविड आजाराच्या संबंधीत अॅन्टीबॉडी आढळली, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जीवरसायनशास्त्र विभागामध्ये तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये २९७५ रक्तनमुन्यांपैकी ४५१ म्हणजेच १५.१६ टक्के रक्त नमुन्यांमध्ये अॅन्टीबॉडी आढळून आली.