सर्व्हर डाउन: खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:53 PM2020-01-15T12:53:54+5:302020-01-15T12:53:59+5:30
खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असून, शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही प्रभावित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वीज पुरवठा खंडित होत असल्याने, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक कार्यालयाच्या दस्त नोंदणीचे सर्व्हर डाउन झाले असल्याने, ‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी गत दोन दिवसांपासून स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असून, शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही प्रभावित झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक कार्यालयाचा वीज पुरवठा सोमवार, १३ जानेवारीपासून खंडित होत आहे. मंगळवारीही या कार्यालयाचा वीज पुरवठा दिवसभर खंडित होता. त्यामुळे सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे दस्त नोंदणीचे ‘आय-सरिता’ सर्व्हर डाउन झाले असून, ‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी या कार्यालयात होणारे घर, प्लॉट, जमीन इत्यादी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार गत दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत.
त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सहजिल्हा निबंधक कार्यालयात ताटकळत बसावे लागत असून, नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
यासोबतच खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने, मुद्रांक शुल्क व दस्त नोंदणीपोटी शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही प्रभावित झाला आहे.
त्यानुषंगाने सहजिल्हा निबंधक कार्यालयाचा वीज पुरवठा, ‘नेट कनेक्टिव्हिटी’ केव्हा सुरळीत होणार आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार केव्हा पूर्ववत होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
५० लाखांचा महसूल प्रभावित!
सहजिल्हा निबंधक कार्यालयात प्रत्येक दिवशी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे सरासरी ४५ ते ५० व्यवहार होतात. खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कापोटी २० ते २५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो; मात्र गत दोन दिवसांपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने, दोन दिवसांत सहजिल्हा निबंधक कार्यालयाला मिळणारा ५० लाख रुपयांचा महसूल प्रभावित झाला आहे.
वीज पुरवठा खंडित होत असल्याने, दस्त नोंदणीचे सर्व्हर डाउन झाले आहे. ‘नेट कनेक्टिव्हिटी’ नसल्याने गत दोन दिवसांपासून स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार विस्कळीत झाले आहेत. ‘नेट कनेक्टिव्हिटी’ समस्या निवारणाचा प्रयत्न सुरू असून, खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होतील.
-डी. एस. भोसले,
सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी.