अधिपरिचारिकांचे सेवा नियमितीकरण अडकले लालफीतशाहीत
By admin | Published: May 28, 2016 01:41 AM2016-05-28T01:41:30+5:302016-05-28T01:41:30+5:30
अकोला मंडळातील ३७५ परिचारिकांचा समावेश
मंगरुळपीर (जि.वाशिम ) : अकोला आरोग्य मंडळांतर्गत असलेल्या वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३७५ बंधपत्रित अधिपरिचारिकांची सेवा नियमितीकरण प्रक्रिया लालफीतशाहीत अडकली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक परिचारिकादिनीही नियमित न झाल्याने बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
शासकीय नर्सिंग स्कूलमध्ये शासकीय खर्चावर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांकडून किमान दोन वर्ष शासकीय सेवा द्यावी म्हणून बंधनपत्र लिहून घेतले जाते. बंधपत्रित कालावधी पूर्ण झाल्यावर ज्यांना सेवेत रहावयाचे असेल, अशा अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित केल्या जाण्याचे प्रचलित धोरण असल्याचे समजते. त्याबाबत सन २00३ मध्ये आरोग्य संचालनालयाकडून पत्रव्यवहारही करण्यात आला होता. सदरच्या अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्याची बाब शासन स्तरावर प्रलंबित, प्रस्तावित असल्याने सदरच्या अधिकपरिचारिकांची माहिती व प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत अकोला परिमंडळाचे उपसंचालकांनी मंडळातील सर्व आस्थापनाकडून माहिती मागविली होती. ज्या परिचारिकांची दोन वर्षाची सेवा पूर्ण झाली, अशा अधिपरिचारिकांचे सेवा नियमितीकरणाचे प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांना पाठवून त्यांच्या सेवा नियमित करणे आवश्यक होते. मात्र, संबंधित कार्यालयाने याबाबत लेटलतिफ धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. हा प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेकदा मागणीही करण्यात आलेली आहे.
विनाअट सेवेत समाविष्ट करण्याची मागणी
बंधपत्रित अधिपरिचारिकांना विनाअट सेवेत नियमित करण्याची मागणी सेवा नियमित न केलेल्या अधिपरिचारिकांकडून केली जात आहे. सुरुवातीच्या सेवा आदेशानुसार बंधपत्रित अधिपरिचारिकांना दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण करणे आवश्यक होते. त्यानुसार ज्या परिचारिकांची दोन वर्षांची सेवा पूर्ण झाली, अशा अधिपरिचारिकांची सेवा अद्याप का पूर्ण करण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.