प्राधान्यक्रम ठरवून विकासकामे तातडीने मार्गी लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:56 AM2021-01-08T04:56:21+5:302021-01-08T04:56:21+5:30

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामांसाठी प्राप्त निधी व खर्चाचा आढावा घेत, उपलब्ध निधीतून प्राधान्यक्रम ठरवून जिल्ह्यातील विकासकामे तातडीने ...

Set priorities and get development work done quickly! | प्राधान्यक्रम ठरवून विकासकामे तातडीने मार्गी लावा!

प्राधान्यक्रम ठरवून विकासकामे तातडीने मार्गी लावा!

Next

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामांसाठी प्राप्त निधी व खर्चाचा आढावा घेत, उपलब्ध निधीतून प्राधान्यक्रम ठरवून जिल्ह्यातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत २०२०-२१ आर्थिक वर्षात विविध विभागांना विकासकामांसाठी प्राप्त झालेला निधी, त्यामधून झालेला खर्च व प्रस्तावित कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत, जिल्ह्यात ज्या बंधाऱ्यांची कामे ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली, अशा बंधाऱ्यांच्या कामांसाठी प्राधान्याने निधी वितरित करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांत फळवर्गीय वृक्षाचे रोपण करावे. तसेच शासकीय कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध जागेवर औषधी वनस्पती वृक्षाची लागवड करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

अनाथ युवक-युवतींसाठी

उपाययोजना करा

अनाथालयामध्ये असणाऱ्या व लवकरच वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण तसेच त्यांच्या कलानुसार पुढील शिक्षण आणि रोजगार या संदर्भात उपाययोजना करून, त्यांना शासकीय पदभरतीमध्ये सहभागी करून घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

भिक्षा मागून जगणाऱ्यांच्या

पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा

विविध ठिकाणी भिक्षा मागून जगणाऱ्या लोकांच्या माहितीचे संकलन करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात एकल महिला (विधवा) सबलीकरणासाठी बचतगट तयार करणे व त्यामार्फत त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेत

१५.६० कोटींचा खर्च!

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत जिल्ह्याकरिता १६५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ५४ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी १९ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपये संबंधित विभागांना वितरित करण्यात आले असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत १५ कोटी ६० लाख ७३ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: Set priorities and get development work done quickly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.