शालेय पोषण आहार वाटपासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 03:37 PM2019-07-28T15:37:14+5:302019-07-28T15:37:17+5:30
शालेय पोषण आहाराचे वाटप शिक्षकांकडे न देता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे निवदेनाद्वारे केली.
अकोला : शिक्षकांचे काम व शिक्षण प्रणाली यामध्ये सुधारणा करून शालेय पोषण आहाराचे वाटप शिक्षकांकडे न देता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे निवदेनाद्वारे केली.
शालेय पोषण आहारात ज्वारी, बाजरीची भाकरी, दूध, अंडी इत्यादी वस्तूंच्या वाटपाचे कामे शिक्षकांकडे देण्यात आली आहेत. यामुळे मूळ शिक्षणाचे काम दुय्यम होऊन याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होईल. त्यामुळे शिक्षकांकडून पोषण आहार वाटपाची कामे काढून त्यांना पूर्णवेळ शैक्षणिक काम देण्यात यावे, अशी मागणी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयात इयत्ता पाचवीसाठी १ किमी व आठवीसाठी ३ किमीची अट नवीन मराठी शाळांना मान्यता देताना कायम ठेवण्यात आली आहे; मात्र या अटींचे उल्लंघन करून अनेक शाळा काढण्यात येत आहेत. हे शासनाच्या अटींचे उल्लंघन आहे. नियम डावलून नवीन शाळांना मान्यता दिल्यास व किलोमीटरची असलेली अट न पाळल्यास याविरुद्ध अमरावती शिक्षण संघातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरनाईक यांनी निवेदनातून दिला आहे.