पालकांच्या सुविधेसाठी मदत केंद्राची स्थापना
By admin | Published: March 4, 2016 02:01 AM2016-03-04T02:01:49+5:302016-03-04T02:01:49+5:30
नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी ११ मार्चपासून ऑनलाइन अर्ज करावे लागणार.
वाशिम: दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी ११ मार्चपासून ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालकांचा गोंधळ उडू नये, म्हणून वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकास्तरावर मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन अँक्ट) मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. राज्यभरातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून त्या-त्या जिल्हय़ात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ात २९ फेब्रुवारी ते ९ मार्च २0१६ या कालावधीत खासगी शाळांनी नोंदणी करणे, ११ ते २८ मार्च २0१६ या दरम्यान पालकांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारणे आणि १ एप्रिल ते ५ एप्रिल २0१६ दरम्यान ड्रॉ काढणे असे वेळापत्रक राहणार आहे. गोरगरीब, शिक्षणाबाबत अनभिज्ञ व संगणकीय अज्ञान असणार्या पालकांना ऑनलाइनद्वारे अर्ज कसा भरावा, याबाबत फारशी माहिती नसू शकते. याचा फायदा नेट कॅफे, ऑनलाइन फार्म सुविधा केंद्रांचे संचालक घेऊ शकतात. पालकांकडून जादा फी घेऊन २५ टक्के मोफत कोट्यातील अर्ज ऑनलाइनद्वारे भरण्याचा धोका लक्षात घेता, वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकास्तरावर मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या मदत केंद्रावर पालकांना योग्य ती माहिती दिली जाणार आहे. याशिवाय अर्ज कसा भरायचा, नियम काय आहेत, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची, याबाबत जनजागृती केली जाणार आहे.