राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात साडेसात लाख शेतकऱ्यांनी जाणून घेतले नवतंत्रज्ञान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 03:28 PM2019-12-30T15:28:08+5:302019-12-30T15:28:43+5:30
यावर्षी ७ लाख ७६ हजारांवर शेतकºयांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नव कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले.
अकोला : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शेती उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होेण्याच्या दिशेने नेण्यात कृषी क्षेत्राची वाटचाल सुरू असून, या कामी कृषी प्रदर्शनाचे योगदानही मोलाचे आहे. रविवारी कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. यावर्षी ७ लाख ७६ हजारांवर शेतकºयांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नव कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले.
कृषिक्रांतीचे प्रणेते कृषिरत्न स्व. भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभागच्यातीने विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी विद्यापीठाच्या मैदानावर भरविण्यात आले होते. रविावारी समारोप समारंभारंभात पारितोषिके वितरण करण्यात आली.
कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी मंत्री महिला शेतकरी वसुधाताई देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. पी.जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, तथा प्रगतिशील शेतकरी अप्पा गुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये विविध संस्थांच्या दालनांमधून शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या कृषी तंत्रांद्वारे शेतकºयांना नवीन दिशा देण्याचे काम विद्यापीठाने केले असल्याचा उल्लेख करीत विद्यापीठ प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन व सांघिक प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे प्रतिपादन वसुधाताई देशमुख यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या आयोजनासाठी संधी दिल्याबद्दल राज्यपाल, मुख्यमंत्री तथा कृषिमंत्री यांचे विशेषाभार व्यक्त करताना जिल्हा प्रशासनानेसुद्धा कृषी विभाग तथा प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत सहयोग दिल्यामुळेच सदर प्रदर्शन शक्य झाल्याचे आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
प्रास्ताविक संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. सकाळच्या सत्रात सुप्रसिद्ध हास्य कवी अॅड. अनंत खेळकर यांनी कृषी कट्टाच्या माध्यमातून उपस्थित शेतकºयांचे प्रबोधन केले.
कृषी प्रदर्शनात दहा कोेटीची उलाढाल!
तीन दिवसीय कृषी प्रदर्शनात यावर्षी १० कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली. या प्रदर्शनादरम्यान ५७२ कृषी संवादिनी २०२०, कृषी पत्रिका मासिकाच्या २२० नवीन सभासदांची नोंदणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० कोटीपेक्षाही अधिक रकमेचा व्यवसाय, उलाढाल विविध यंत्र अवजारे, कृषी निविष्टा, प्रकाशने व बचत गटाद्वारे निर्मित कृषी मालाच्या विक्रीतून झाला.