अकोला जिल्ह्यात उद्यापासून सात कोविड केअर सेंटर सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 10:21 AM2021-02-21T10:21:23+5:302021-02-21T10:24:45+5:30

Covid Care Center in Akola बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.

Seven Covid Care Centers to be started in Akola district from tomorrow! | अकोला जिल्ह्यात उद्यापासून सात कोविड केअर सेंटर सुरू!

अकोला जिल्ह्यात उद्यापासून सात कोविड केअर सेंटर सुरू!

Next
ठळक मुद्देआता सर्वांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारकहाेम आयसोलेशन रुग्णही कोविड सेंटरमध्ये करणार संदर्भित

अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरची स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून पॉझिटिव्ह रुग्णाला थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. ऑक्टोबर २०२० नंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घसरण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सातही कोविड केअर सेंटर बंद करून बहुतांश रुग्णांना होम आयसोलेशनमध्येच संदर्भित करण्यात आले होते. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर फेब्रुवारीमध्ये कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या बेफिकरीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने पसरत आहे. परिणामी, बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी जिल्ह्यातील सातही कोविड केअर सेंटरची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. याठिकाणी ज्या रुग्णांना कोविडची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा सर्वच रुग्णांना, तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे.

दोन सेंटर सुरू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवारी जिल्ह्यात दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये अकोल्यातील तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय आणि अकोट तालुक्यातील हेंडास्थित आयडीआय या दोन कोविड केअर सेंटरचा समावेश आहे. या दोन्ही सेंटरमध्ये शनिवारी कोविड रुग्णांना दाखल करण्यात आले.

 

तालुकानिहाय कोविड केअर सेंटर

 

तालुका - कोविड केअर सेंटर

अकोट - देवरी फाटा

अकोट - आयडीआय हेंडा (सुरू)

तेल्हारा - जि.प. शाळा

बाळापूर - शेळद

पातूर - आयुर्वेदिक कॉलेज

अकोला - आरसीटी (आयुर्वेदिक- आजपासून सुरू)

अकोला - पीकेव्ही येथील प्रोसेस सुरू आहे.

 

अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्णाशी संपर्क

कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच आरोग्य यंत्रणा रुग्णाशी थेट संपर्क साधणार आहे.

यासाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र चमू गठित करण्यात आले आहेत.

लक्षणे असतील, तर रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाईल.

लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये नेले जाईल.

नियमानुसार घरात सर्व सुविधा असतील, तरच रुग्णाला होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल.

 

खासगी क्वारंटाइन सेंटरही होईल सुरू

जिल्ह्यात तालुकानिहाय शासकीय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील बाळापूर रोडस्थित तुषार हॉटेल येथे खासगी क्वारंटाइन सेंटरही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. कोविडच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस कार्यवाही केली जात आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ज्या रुग्णांकडून नियमांचे पालन होत नाही, अशांवर कारवाई केली जाईल.

-डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ

Web Title: Seven Covid Care Centers to be started in Akola district from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.