‘भरोसा सेल’कडे तब्बल सातशेवर तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:20 PM2019-11-04T12:20:32+5:302019-11-04T12:21:01+5:30
४९८ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न करता जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद घेऊन त्याचा निपटारा करण्यात आला आहे.
अकोला: महिला, मुली व वयोवृद्धांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या भरोसा सेलचा विश्वास नऊ महिन्यांतच वाढल्याचे त्यांच्याकडे नऊ महिन्यांत झालेल्या तक्रारींच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सेलकडे सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच ७७० च्यावर तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामधून सुमारे ३०० वर तक्रारींचा निपटारा करण्यात सेलला यश आले आहे.
अकोल्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ७७० तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या असून, यामध्ये १६२ तक्रारींवर कायदेशीर कारवाई करताना तडजोड झालेली नाही. २५२ प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्यांनी स्वत:हून तक्रार मागे घेत तसेच त्यांचे समुपदेशन करून या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ४९८ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल न करता जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद घेऊन त्याचा निपटारा करण्यात आला आहे. १७ प्रकरणे जिल्ह्याच्या बाहेरील असून, त्यांच्या पत्नीचे माहेर असलेल्या जिल्ह्यात हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. त्या सर्वांचे १६९ प्रकरणांमध्ये कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २३० प्रकरणांमध्ये भरोसा सेलने समेट घडवून आणला असून, यासाठी भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक संजीव राऊत यांनी प्रयत्न केले आहेत. व्यसनाधीनता, फसवणूक, लग्नाच्या आधी खोटी माहिती देणे, अपेक्षाभंग, संशय, विवाहबाह्य संबंध अशा विविध कारणांच्या तक्रारी भरोसा या महिला तक्रार निवारण केंद्रांमध्ये दाखल झाल्या होत्या. जिल्ह्यातील महिलांना प्रथम समुपदेशन करून कायदेशीर सल्ला दिला जातो. यामध्ये विधी अधिकारी, संरक्षण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांचे सहकार्य घेऊन प्रकरण आपसात करण्याचा प्रयत्न हा सेल करीत आहेत.
मोबाइल प्रचंड घातक
मोबाइलवरील सोशल मीडियाचे थेट दुष्परिणाम कौटुंबिक कलहामध्ये दिसायला लागले आहेत. वास्तव जीवनापेक्षा केवळ स्वप्नातील आयुष्याचा पाठलाग काही मुली करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त आहेत. मोबाइलचा अट्टहास अनेक संसारांमध्ये दरी निर्माण करीत असल्याचेही भरोसा सेलकडे झालेल्या तक्रारीवरून समोर आले आहे.
मोबाइलचा अतिरेक तसेच संशय, विवाहबाह्य संबंधाची खात्री न करता केवळ सांगण्यावरून संशय घेत असल्यानेही संसार मोडल्याचे वास्तव आहे. यासारख्या अनेक तक्रारी येतात; परंतु गुन्हे दाखल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत पती-पत्नी यांचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
- संजीव राऊत, पोलीस निरीक्षक,
भरोसा सेल, अकोला.