सात लाखांचा गुटख्याचा साठा जप्त!
By admin | Published: June 2, 2017 01:54 AM2017-06-02T01:54:27+5:302017-06-02T01:54:27+5:30
विशेष पथकाची कारवाई: आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी कोठडी बाजारातील अंबिका ट्रेडर्स आणि जगदंबा पान सेंटरवर छापा घालून सात लाख रुपये किमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त केला. पोलिसांनी घनश्याम सीताराम अग्रवाल (५२) याला अटक केली.
विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना कोठडी बाजार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. अळसपुरे यांनी पोलीस पथकासह कोठडी बाजारामधील घनश्याम अग्रवाल याच्या अंबिका ट्रेडर्स आणि जगदंबा पान सेंटर या दोन्ही दुकानांवर छापा घालून ७ लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी, तंबाखूची पाकिटे असा साठा जप्त केला आणि घनश्याम अग्रवाल याला अटक केली. जप्त केलेला गुटखा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केला. तीन वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई येथील दक्षता पथकाने अग्रवाल याच्या दुकानांवर छापा घालून २५ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. त्यानंतर घनश्याम अग्रवाल याच्या दुकानावर एकही कारवाई करण्यात आली नाही. अन्न व औषध प्रशासनाने तर गुटखा माफियांकडे पूर्णत: डोळेझाक केली असून, शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचा साठा गुटखा माफियांनी करून ठेवला आहे. तीन वर्षानंतर अळसपुरे यांनी अग्रवालविरुद्ध कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला.