महापौर पदासाठी सात जणांनी घेतले अर्ज
By admin | Published: March 4, 2017 02:44 AM2017-03-04T02:44:42+5:302017-03-04T02:44:42+5:30
उपमहापौर पदासाठी सहा जणांना उमेदवारी अर्जांचे वाटप.
अकोला, दि. ३- महापालिकेची निवडणूक आटोपल्यानंतर येत्या ९ मार्च रोजी आयोजित विशेष सभेत महापौर, उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडेल. या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्जांचे वाटप शुक्रवारी झाले असता महापौर पदासाठी भाजपच्यावतीने विजय अग्रवाल यांच्यासह सात जणांनी, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या वैशाली शेळके यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. शनिवारी संबंधित उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्या जातील.
महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी प्रशासनाने ९ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. शनिवारी (४ मार्च) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील.
महापालिका क्षेत्रातील २0 प्रभागांतील ८0 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असता भाजपच्या वाटेला ८0 पैकी ४८ जागा आल्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग खुला झाला आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमधून महापौर, उपमहापौर पदासाठी निवड करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी ९ मार्च रोजी विशेष सभेची तारीख निश्चित केली आहे.
त्यानुषंगाने महापौर पदासाठी भाजपच्यावतीने विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, बाळ टाले, राहुल देशमुख, आशिष पवित्रकार, सुनीता अग्रवाल तसेच काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद यांनी उमेदवारी अर्ज घेतला. उपमहापौर पदासाठी भाजपच्यावतीने वैशाली विलास शेळके, शारदा खेडकर, आशिष पवित्रकार शिवसेनेच्यावतीने राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज घेतले. शनिवारी मनपा प्रशासनाकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारल्या जातील.
काँग्रेसला राकाँ साथ देईल का?
महापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद यांनी उमेदवारी अर्ज घेतला. सद्यस्थितीत काँग्रेसचे संख्याबळ १३ असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाच आहे. एमआयएमचा एक उमेदवार निवडून आला आहे. मनपाची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढली. अशा स्थितीत महापौर पदासाठी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने घेतलेला अर्ज पाहता राष्ट्रवादी व एमआयएम काँग्रेसला साथ देईल का, असा सवाल उपस्थित होतो. वेळप्रसंगी राक ाँने साथ दिली, तरीही काँग्रेसचे संख्याबळ १९ च्या वर जात नसून, भाजपसमोर हे संख्याबळ अतिशय तोकडे पडणार आहे.