आंदोलनामुळे अकोला मार्गे जाणाऱ्या सात रेल्वे गाड्या रद्द
By Atul.jaiswal | Published: September 19, 2023 03:57 PM2023-09-19T15:57:44+5:302023-09-19T15:58:07+5:30
झारखंडमध्ये आहे प्रस्तावित कुर्मी आंदोलन
अतुल जयस्वाल, अकोला: कुर्मी संघटनांनी झारखंड राज्यात बुधवार, २० सप्टेंबर रोजी रेल्वे रोको आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या हावडा ते मुंबई व हावडा ते पुणे या मार्गावरील गीतांजली, आझाद हिंद एक्स्प्रेससह सात एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या. या सर्व रेल्वे गाड्या अकोला स्थानकावरून जाणाऱ्या असल्यामुळे अकोलेकर प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
कुर्मी समुदायाचा समावेश अनुसूचीत जाती (एसटी) मध्ये करणे व कुरमाली भाषेला संविधानाच्या आठव्या अनुसुचित समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी कुर्मी संघटनांनी २० सप्टेंबर रोजी झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल राज्यातील विविध रेल्वेस्थानकांवर बेमुदत रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनामुळे ज्या रेल्वे गाड्या मंगळवारी प्रस्थान करून झारखंड राज्यात प्रवेश करणार होत्या त्या सर्व एक तर रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांचा मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी या गाड्या झाल्या रद्द
- १२१०१ एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस
- १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस
- १२२६१ सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेस
- १२८०९ सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस
- १२८५९ सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस
- २२५११ एलटीटी-कामाख्या कर्मभूमी एक्स्प्रेस
- १८०२९ एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस