लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सात वर्षीय आदिवासी मुलाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:34 PM2018-12-09T13:34:55+5:302018-12-09T13:39:11+5:30
अकोट : हिवरखेड मार्गावरील एका हॉटेलात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सात वर्षीय आदिवासी मुलाची हत्या करण्यात आली. सदर घटना ५ डिसेंबर रोजी घडली.
अकोट : हिवरखेड मार्गावरील एका हॉटेलात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सात वर्षीय आदिवासी मुलाची हत्या करण्यात आली. सदर घटना ५ डिसेंबर रोजी घडली. मारहाण केलेल्या अवस्थेत त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती केले असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पोलीस तपासात मारहाणीमागील गंभीर बाब समोर येण्याची शक्यता पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीत मध्य प्रदेशातील नेफा नगर येथील मूळचा रहिवासी कृष्णा गणेश जांभेकर हा आदिवासी मुलगा हिवरखेड मार्गावरील फिजा हॉटेलवर राहत होता. या ठिकाणी आरोपी फिरोज खान अकबर खान, सलीम खान अकबर खान दोघेही रा. इंदिरा नगर अकोट यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गंभीर अवस्थेत अकोट ग्रामीण रुग्णालय व तेथून अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात त्याच्या अंगावर चटके दिल्याचे आढळून आले. सदर मुलाचा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर अकोट ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून उपरोक्त आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाई अकोट शहर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे करीत आहेत. या कारवाईत ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर व शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह नारायण वाडेकर, सुनील फोकमारे, गजानन भगत, प्रवीण गवळी, अनिल सिरसाट, नंदू कुलट, राजेश कोहरे, राजेश जौंधारकर, रामेश्वर भगत यांनी आरोपी पळून जाण्याआधीच शिताफीने अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
फोटो आहे