चारमोळी येथे चार महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:51+5:302021-05-22T04:17:51+5:30
अमोल सोनोने पांढूर्णा: पातूर तालुक्यातील चारमोळी येथे चार महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांची भटकंती होत आहे. नागरिकांना ...
अमोल सोनोने
पांढूर्णा: पातूर तालुक्यातील चारमोळी येथे चार महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांची भटकंती होत आहे. नागरिकांना दोन कि.मी. अंतराहून पाणी आणावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
पांढूर्णा येथून जवळच असलेल्या चारमोळी येथे गत चार महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्यांची भटकंती होत आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून नागरिकांना डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. चारमोळी हे गाव आदिवासी बाहुल गाव असल्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याबाबत लोक प्रतीनिधींना अनेक वेळा निवेदने दिले आहेत; मात्र गावातील परिस्थिती जैसे थे आहे.
-------------------------------------------------------
पाणी फाऊंडेशनने केली होती प्रशंसा
पातूर तालुक्यातील चारमोळी या गावाने पाणी फाऊंडेशनतर्फे मोठे काम केले. या स्पर्धेत गावाने चौथा क्रमांक सुद्धा मिळविला होता. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार या आशेत असलेल्या ग्रामस्थांना निराशेचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
-------------------------------------------------------
धरण उशाला, कोरड घशाला!
चारमोळी या गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर तालुक्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाचे पिण्याचे पाणी तालुक्यातील १४ गावांना पोहोचते; मात्र तीन किलोमीटर अंतरावर चारमोळीवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.