अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 11:02 AM2022-07-17T11:02:44+5:302022-07-17T11:05:22+5:30
Sexual assault on minor girl : आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण याने मुलीला बळजबरीने उचलून जवळील एका नाल्यात नेले.
अकोला : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने शनिवारी दुपारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पीडित मुलीच्या काकूने ६ एप्रिल २०१४ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शेतातील विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता, आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण याने मुलीला बळजबरीने उचलून जवळील एका नाल्यात नेले. या ठिकाणी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. बराच वेळ होऊनही मुलगी परतली नसल्याने, काकूसह इतर महिला तिला शोधण्यासाठी गेल्या असता, त्यांना आरोपी उल्हास चव्हाण हा मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. महिलांना पाहून आरोपी पळून गेला. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६(२), पोक्सो, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. बार्शीटाकळी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष व पुराव्या आधारे न्यायालयाने आरोपी उल्हास चव्हाण याला जन्मठेपेच्या शिक्षेसह ५० हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, पोक्सो कायद्यानुसार ५० हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास, पीडित मुलगी व कुटुंबीयांना धमकी दिल्या प्रकरणात ७ वर्षे शिक्षा, १० हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा तत्कालीन पीएसआय कडेखन पठाण यांनी तपास केला होता. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली. एच. सी. पिंजरकर व सीएमएसचे एएसआय प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.