विद्यार्थिनींना अश्लील मॅसेज;शिक्षकास चोप!
By admin | Published: April 4, 2017 01:22 AM2017-04-04T01:22:51+5:302017-04-04T01:22:51+5:30
पालकांनी केली शाळेत शिरून मारहाण
पातूर: विद्यार्थिनींना अश्लील मॅसेज पाठविणाऱ्या एका शिक्षकास १००ते १५० पालकांनी शाळेत जाऊन चांगलाच चोप दिल्याची घटना सस्ती येथील एका विद्यालयात ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेमुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्राचार्यांच्या कक्षात या शिक्षकाने आपल्या चुकीची कबुलीही दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार सस्ती येथील एका विद्यालयात एका शिक्षकाने काही विद्यार्थिनींना अश्लील मॅसेज पाठविले होते. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने लहान मुलींकडून मोठ्या मुलींना चिठ्ठी पाठवून आपला मोबाइल क्रमांक दिला. आई-वडील घरी नसताना घरी बोलावण्याचे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिले होते. ही चिठ्ठी एका मुलीने पालकांना दाखविल्याने हा प्रकार उघड झाला. ही बाब त्यांनी इतर पालकांना सांगितल्याने जवळपास १०० ते १५० पालकांनी आज संबंधित शाळेवर धडक दिली. यावेळी पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. प्राचार्यांच्या कक्षात या शिक्षकास पालकांनी खडसावून विचारले असता त्याने विद्यार्थिनींना मॅसेज पाठविल्याचे कबूल केले. अखेर त्याच्याकडून प्राचार्यांनी माफीनामा लिहून घेतला. आता संचालक मंडळ काय कारवाई करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पोलीस कोठडी
अकोला: जेतवन नगरातील दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी आॅटोचालकास खदान पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.
जेतवन नगरातील दहा वर्षाच्या मुलीला शेजारी राहणाऱ्या आॅटोचालकाने बळजबरीने स्वत:च्या घरी उचलून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याच्या बेतात असतानाच तिने आरडाओरड करीत आॅटोचालकाच्या घरातून पळ काढला. दरम्यान, मुलगी घरी नसल्याचे पाहून त्या मुलीच्या आईनेही तिचा शोध सुरू केला होता. एवढ्यातच एका गल्लीतून सदर मुलगी रडत येत असल्याचे मुलीच्या आईला दिसले. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच त्या दोघीही प्रचंड घाबरल्या. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी आॅटोचालक शेख समीर शेख जमीर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला रविवारी सायंकाळी अटक केल्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.