Zero Shadow Day : आज दुपारी सावली साथ सोडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:05 AM2020-05-23T10:05:21+5:302020-05-23T10:05:35+5:30
सावली २३ मे रोजी दुपारी काही कालावधीसाठी आपली साथ सोडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नेहमी आपल्या सोबतीला असणारी सावली २३ मे रोजी दुपारी काही कालावधीसाठी आपली साथ सोडणार आहे.
अकोल्यातील या दिवशीचा सूर्योदय सकाळी ५.४४ वाजता होईल तर सूर्यास्त ६.५३ वाजता होईल. म्हणूनच शून्य सावलीची वेळ १२.१८ मिनिटांनी राहील. लॉकडाउनच्या काळात प्रत्येक आकाशप्रेमींनी हा अनुभव आपल्या अंगणातून व छतावरून घ्यावा, असाच अनुभव अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर येथेही घेता येईल. २२ मे रोजी पातूर परिसर, २४ मे रोजी तेल्हारा व अकोट परिसरातूनही शून्य सावली अनुभवता येईल. यासाठी एखादा पाइपचा तुकडा किंवा पावडरचा उंच डबा वा भरणीचा वापर करता येईल. खगोलप्रेमींनी शून्य सावलीचा विरंगुळा म्हणून आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे. महाराष्ट्रात दक्षिण भागातील सुरू झालेला हा उत्सव ३ मे ते ३१ मेपर्यंत अनुभवता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. (प्रतिनिधी)