शालेय उपयोगी माहितीसाठी आता शगुन पोर्टल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 02:16 PM2017-10-28T14:16:00+5:302017-10-28T14:19:57+5:30
अकोला : राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक योजना, शाळांची, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, यासोबतच विविध शालेय उपयोगी उपक्रमांची माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने शगुन (शाळा गुणवत्ता) नावाचे शैक्षणिक आॅनलाइन पोर्टल तयार केले आहे.
अकोला : राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक योजना, शाळांची, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, यासोबतच विविध शालेय उपयोगी उपक्रमांची माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने शगुन (शाळा गुणवत्ता) नावाचे शैक्षणिक आॅनलाइन पोर्टल तयार केले आहे.
शा म्हणजे शाळा व गुन म्हणजे गुणवत्ता याचेच एकत्रीकरण करून शगुन नावाचे पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, इतर राज्यांच्या शैक्षणिक यशोगाथा आणि जनतेला शैक्षणिक घडामोडींची माहिती व्हावी आणि या माहितीचा इतर राज्यांमधील शाळांना उपयोग व्हावा, या उद्देशाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. शासनाने सर्व शिक्षा अभियान २०१७ व १८ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीच्या अनुषंगाने राज्यात घडत असलेल्या प्रेरक बाबी आणि यशोगाथा व राज्याची वार्षिक कार्य योजना शगुन पोर्टलवर टाकण्याचे निर्देश दिले होते. काही राज्यांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या अनेक पद्धतीचा वापर करून शालेय शिक्षण परिसर व शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यावर भर देण्यात येतो. या पोर्टलवर सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्याची उपक्रमनिहाय निधीबाबतची माहिती, भौतिक, आर्थिक उद्दिष्ट व निधीच्या उपाययोजनेची माहिती, तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील तालुकानिहाय, शाळानिहाय उपक्रमांची माहिती द्यायची आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून जिल्हा, तालुका स्तरावर राबविण्यात आलेल्या यशस्वी उपक्रम, यशोगाथांचे व्हिडिओ शगुन पोर्टलवर टाकण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. हे व्हिडिओ इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असावेत, तसेच पीएसएम, गणवेश वितरण पाठ्यपुस्तक वितरण, शाळा भेटी, ज्ञानरचनावाद पद्धतीचे शिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण, बैठक, प्रगत शाळा भेटी, शिक्षकांचे प्रशिक्षण, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरक्षणाचे धडे, क्रीडा स्पर्धा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम शगुन पोर्टल टाकण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर बोलक्या भिंती, डिजिटल शाळा, मुलांच्या गैरहजेरीचे प्रमाण, शिक्षणाची रुची, शाळा प्रवेशोत्सव, पटनोंदणी, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, विज्ञान, गणित कट्टा आदींची माहितीसुद्धा शिक्षकांना शगुनवर टाकावी लागणार आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाचे काम करणाºया सहायक कार्यक्रम अधिकाºयांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. शगुन पोर्टलवर माहितीबाबतचा आढावा प्रत्येक सोमवारी घेण्यात येईल. (प्रतिनिधी)