शहीद, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणी-घरपट्टी माफ करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:46 PM2019-06-08T12:46:00+5:302019-06-08T12:46:03+5:30
शहीद जवानांचे कुटुंब, माजी सैनिक व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणी-घरपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
अकोला : शहीद जवानांचे कुटुंंब, माजी सैनिक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणीपट्टी व घरपट्टी (कर) माफ करण्यात यावा, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला असून, हा ठराव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्याचे सभेत ठरविण्यात आले.
जिल्ह्यातील शहीद जवानांचे कुटुंब, माजी सैनिकांचे कुटुंब आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणीपट्टी व घरपट्टी (कर) माफ करण्यात यावा, अशी मागणी समितीचे सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत केली. त्यानुषंगाने शहीद जवानांचे कुटुंब, माजी सैनिक व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाणी-घरपट्टी माफ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचेही ठरविण्यात आले.
चारा डेपो सुरू करा!
दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत केली. त्यानुषंगाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले.
लाभार्थींना घरकुलाचा लाभ द्या!
माझोड येथील रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सभेत केली.