बार्शिटाकळी येथील गोळीबार प्रकरणातील जखमी साकीबचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:42+5:302021-06-24T04:14:42+5:30
शहरात दि. २४ मे २०२१ रोजी दोन कापूस व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या घटनेत गावठी कट्ट्यामधून गोळ्या झाडल्या गेल्या. ...
शहरात दि. २४ मे २०२१ रोजी दोन कापूस व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या घटनेत गावठी कट्ट्यामधून गोळ्या झाडल्या गेल्या. त्यापैकी एक गोळी घटनास्थळाजवळून जात असताना गायगाव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. अकोला येथील खासगी रुग्णालयातून ऑपरेशननंतर ती गोळी काढण्यात आली. या वादात मोहम्मद साकीब मो. गफ्फर, शेख नदीम शेख मुनिर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी शेख नदीम बरा होऊन घरी परतला; मात्र मोहम्मद साकीब यांचा एका महिन्यानंतर उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाला. अकोल्याहून मृतदेह बार्शीटाकळीकडे रवाना झाला. त्यावेळी मृतांचे नातेवाईक पोलीस स्टेशनसमोर जमले होते. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर उभे राहून पोलिसांविरोधात निदर्शने केली. या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ पकडण्याची मागणी नातेवाईकांनी केली. सकाळी मो. साकीब यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहरातील वातावरण तापले होते. त्यामुळे घटनास्थळ परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता.
--------------------------
पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
एक महिना उलटून गेल्यानंतरही घटनेचा तपास थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना वादात वापरलेली गावठी पिस्तूल आजपर्यंत हस्तगत केली नसून, काही आरोपी अद्यापही फरारच आहेत. घटनेच्या दिवशी खडकपुरा परिसरात आरोपी धाक दाखविण्यासाठी आले असता, त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते. त्यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवली असती, तर घटना घडली नसती, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी बुधवारी पोलीस स्टेशनमधे दिलेल्या तक्रारीतून केला. ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.