रस्त्यावरील खड्ड्यात लावले बेशरमचे झाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:04+5:302021-08-28T04:23:04+5:30
‘खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट, वाहनचालकांची दुखते पाठ’ असे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी २७ रोजी प्रकाशित होताच माजी आमदार गव्हाणकर यांनी परिसरातील ...
‘खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट, वाहनचालकांची दुखते पाठ’ असे वृत्त लोकमतमध्ये शुक्रवारी २७ रोजी प्रकाशित होताच माजी आमदार गव्हाणकर यांनी परिसरातील ग्रामस्थांसह हातरुण ते लोणाग्रा फाटा रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमचे झाड लावले.
हातरुण ते लोणाग्रा फाटा या रस्त्याचे अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थरही शिल्लक राहिला नसून पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडतात. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने दिली. मात्र या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. अकोला शहराला जोडणारा कमी अंतराचा हा मार्ग असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून हातरुण ते लोणाग्रा फाटा रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी पंचायत समिती सदस्य मंजुर शाह, बंडूभाऊ गावंडे, विलास मेतकर, अमित काळे, महेश गावंडे, जावेद शाह, संतोष गव्हाळे हजर होते.
फोटो:
या रस्त्यावरून रोज नागरिकांना ये-जा करावी लागते. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे असल्यामुळे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात बेशरमचे झाड लावण्यात आले. रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे.
- नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर