‘नरेगा’मध्ये आता ‘शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 10:43 AM2020-12-20T10:43:30+5:302020-12-20T10:45:34+5:30
'Sharad Pawar Gram Samrudhi' scheme ‘शरद पवार ग्रामसमृद्धी ‘ योजना ही राज्य योजना म्हणून राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला.
- संतोष येलकर
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) काही योजनांच्या संयोजनातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी ’योजना राज्य योजना म्हणून राबविण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने १५ डिसेंबर रोजी घेतला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या काही योजनांच्या संयोजनातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी ‘ योजना ही राज्य योजना म्हणून राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. राज्यातील ग्रामीण भागात कामांची मागणी करणाऱ्या प्रत्येक लाभार्थीला ‘शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजनेंतर्गत चार वैयक्तिक स्वरूपाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येणार असून, ही योजना राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांत राबविण्यात येणार आहे.
योजनेत समाविष्ट अशी आहेत कामे !
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत गायी व म्हशींसाठी पक्का गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, भू...संजीवनी नाडेप कंपोस्टिंग चार कामांसह वैयक्तिक वृक्षलागवड व संगोपन, वैयक्तिक शेततळे, शेत किंवा बांधावर वृक्षलागवड (बिहार पॅटर्न), शोष खड्डे व कंपोस्ट बंडिंग इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. ही कामे करताना अकुशल व कुशल कामांचे ६०:४० चे प्रमाण राखण्यात येणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागात कामांची मागणी करणाऱ्या लाभार्थींना समृद्ध करण्याच्या हेतूने विविध कामांच्या संयोजनातून ६०:४०च्या प्रमाणात बसणारी कामे या योजनेत उपलब्ध करून देण्यात येतील.
- नंद कुमार, प्रधान सचिव, रोहयो विभाग