स्वबळावर मिळविले शराफतने ‘गेट’ परीक्षेत यश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:43 PM2020-03-20T18:43:51+5:302020-03-20T18:43:57+5:30
कोणताही शिकवणी वा मार्गदर्शन वर्गात प्रवेश न घेता, स्वबळावर ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण केली.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: खूपच कमी पदवीधर अभियंता ‘गेट’ परीक्षेची तयारी करतात. गेट (जीएटीई २०२०)मध्ये उचित स्थान प्राप्त करण्यासाठी वेळ, बुद्धिमता आणि आर्थिक स्थिती महत्त्वपूर्ण असते. लाखो रुपये शिकवणी वर्गावर खर्च होतात; मात्र खूपच कमी विद्यार्थ्यांना यामध्ये यश मिळते; परंतु अकोल्यातील एक युवा असा आहे की, ज्याने कोणताही शिकवणी वा मार्गदर्शन वर्गात प्रवेश न घेता, स्वबळावर ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण केली. केवळ उत्तीर्णच नाही केली, तर अखिल भारतीय स्तरावर १४५ वे स्थान प्राप्त केले. या विद्यार्थ्याचे नाव आहे शराफतउल्ला किफायतउल्लाह खान. शराफत अकोट फैल येथे राहतो.
शराफतने कधीच शिकवणी वर्ग लावला नाही. कारण त्याला त्याच्या स्वत:च्या अभ्यास पद्धतीवर विश्वास होता. दहाव्या वर्गापर्यंत मिल्लत उर्दू हायस्कूल येथे शिक्षण घेतले. यवतमाळ शासकीय महाविद्यालयातून पॉलिटेक्निक करू न पुण्यातील जेएसपीएम इंपीरियल महाविद्यालयातून बी.ई. पदवी प्राप्त केली. यानंतर पहिल्यांदा गेट परीक्षा दिली; मात्र असफलता मिळाली. हार न मानता शराफतने मनाशी खुणगाठ बांधली की, गेट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करायचीच.
सर्वात पहिले त्याने गेट परीक्षा अभ्यासाकरिता असलेली आवश्यक पुस्तके विकत घेतली. इंटरनेटवरू न ‘गेट’संदर्भातील वेबसाइट्स, यूट्युब व्हिडिओ आणि ब्लॉगवरू न शराफतने माहिती घेण्यास सुरुवात केली. यावरू नच शराफत अभ्यास करीत गेला. मोबाइल आणि अन्य गॅझेट्स शराफतचा शिकवणी वर्ग आणि मार्गदर्शक झाले. गेट परीक्षेकरिता खासगी शिकवणी वर्ग महत्त्वाचा भाग मानला जातो; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे लाखो रुपये खर्च करू न शिकवणी वर्गात प्रवेश घेणे शराफतसाठी अशक्य होते.
शराफतच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे. त्यात वडील मानसिक विकलांग आहेत. जेथे राहतो, त्या ठिकाणी अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शराफतने गेट परीक्षेत गुणवत्ता यादीत भारतातून १४५ वे स्थान प्राप्त केले. स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनने शराफतचा याबद्दल गौरव केला. शराफतने प्राप्त केलेले मोठे यश युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, एवढे मात्र निश्चित.