आई-बहिणीच्या हत्याकांडातील आरोपी शर्मा निर्दोष
By admin | Published: June 29, 2016 02:01 AM2016-06-29T02:01:59+5:302016-06-29T02:01:59+5:30
रणपिसे नगरमध्ये २0१३ ला घडला होता थरार : २४ साक्षीदारांपैकी अनेक साक्षीदार फितुर.
अकोला: रणपिसे नगरमधील रेणुका अपार्टमेंटमध्ये १८ डिसेंबर २0१३ रोजी घडलेल्या मनपा शिक्षिका ज्योती शर्मा व त्यांची मुलगी राणी शर्मा यांच्या हत्याकांडातील आरोपी त्यांचाच मुलगा आदित्य शर्मा याची जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष सुटका केली. या हत्याकांडात घटनास्थळी पुरावे नव्हते तर २४ साक्षीदारांपैकी अनेक साक्षीदार फितुर झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने दिले. रणपिसे नगरातील रेणुका अपार्टमेंट येथील रहिवासी तथा मनपा शाळेच्या शिक्षिका ज्योती गोविंद शर्मा (४८) आणि त्यांची मुलगी राणी ऊर्फ ऐश्वर्या गोविंद शर्मा (१९) या माय-लेकीची १८ डिसेंबर २0१३ रोजी गळा चिरून व मुसळ डोक्यात घालून हत्या करण्यात आली होती. तर आदित्य शर्मा याचे मारेकर्यांनी अपहरण केल्याचा देखावा करण्यात आला होता; मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासह सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी गोविंद भिखुलाल शर्मा यांच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकर्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीमध्ये ज्योती शर्मा व राणी शर्मा यांची हत्या पती गोविंद शर्मा व त्यांचा मुलगा आदित्य शर्माने केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गोविंद शर्मा यांना ताब्यातही घेतले होते तर आदित्य शर्मा फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. घटनेनंतर ३ ते ४ महिन्यानंतर आदित्य शर्मा याला हरिद्वार येथून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सिव्हिल लाइन्सचे तत्कालीन ठाणेदार सावकार यांच्या मार्गदर्शनामध्ये केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने या प्रकरणात तब्बल २४ साक्षीदार तपासले; मात्र तपास अधिकारी व डॉक्टर वगळता बहुतांश साक्षीदार फितुर झाले तर पुरावे गोळा करण्यात पोलीसही अपयशी ठरल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने आदित्य शर्मा याची आई व बहिणीच्या हत्याकांड प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. मोहन मोयल आणि अँड. सत्यनारायण जोशी यांनी कामकाज पाहिले.