शत्रुघ्न बिरकड, रोहिदास पवार, सागर गुल्हाने, अमित चव्हाण यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:37 PM2018-02-13T15:37:19+5:302018-02-13T15:39:35+5:30
अकोला : बहुप्रतीक्षित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यातील ११ खेळाडू, क्रीडा संघटक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
अकोला : बहुप्रतीक्षित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यातील ११ खेळाडू, क्रीडा संघटक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अकोलाचे शत्रुघ्न बिरकड, वाशिमचे रोहिदास पवार, सागर गुल्हाने आणि अमित चव्हाण यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
अकोलाचे शत्रुघ्न हरिभाऊ बिरकड (सन २०१६-१७) व वाशिमचे रोहिदास रायसिंग पवार (सन २०१४-१५) यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक व कार्यकर्त्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तर वाशिमचेच सागर गणेश गुल्हाने (सन २०१४-१५) व अमित अनिल चव्हाण (सन २०१५-१६) यांना आट्या-पाट्या खेळाकरिता उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कार यादीत अमरावतीच्या पूर्वशा सुधीर शेंडे (आर्चरी), वृषाली दिनकर गोरले (आर्चरी थेट), नीता हरिभाऊ रंगे (आटया-पाटया), प्रमोद श्यामराव चांदूरकर (संघटक/कार्यकर्ता), तुषार प्रभाकर शेळके (आर्चरी), स्वप्निल सुनील धोपाडे (बुद्धिबळ थेट) यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तसेच संगीता किरणसिंह येवतीकर यांना (संघटक/कार्यकर्ता) जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ते, खेळाडू व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी खेळासाठी आपले सर्वस्व अर्पण करू न महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अतुलनीय असे स्थान संपादिले आहे. तसेच ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा क्रीडा कार्यकर्तृत्वाचा महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनावर संस्मरणीय असा प्रभाव पडला आहे, अशांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार राज्यातील ७६, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १०९, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक-कार्यकर्ते) १२६, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ३८७, राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ३४, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) ४४, असे तिन्ही वर्ष मिळून एकूण ७७६ अर्ज शासनाला प्राप्त झाले होते. त्यामधून १९५ खेळाडू, संघटक, मार्गदर्शकांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.