शेगाव-पंढरपूर पालखी मार्ग खोदून ठेवल्याने चिखलमय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:42+5:302021-06-26T04:14:42+5:30
हातरुण : शेगाव-पंढरपूर राज्यमार्ग अंतर्गत येणाऱ्या शेगाव, निमकर्दा, गायगाव, वाडेगाव रस्त्याचे काम गत तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. ...
हातरुण : शेगाव-पंढरपूर राज्यमार्ग अंतर्गत येणाऱ्या शेगाव, निमकर्दा, गायगाव, वाडेगाव रस्त्याचे काम गत तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, सद्या काम थंडबस्त्यात पडले आहे. हा पालखी मार्ग खोदून ठेवल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मार्गाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीपदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी निवेदन सादर केले आहे.
या मार्गाहून हजारो भाविक शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शनासाठी ये-जा करतात, तसेच वर्दळ सुरूच असते. परिसरातील नागरिकांसाठी मुख्य बाजारपेठ अकोला असल्यामुळे पातूर तालुका, बाळापूर तालुका, तेल्हारा तालुका, तसेच वाडेगाव येथील नागरिक अकोला येथे येतात. रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्यावर मातीच माती पसरली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने वाहने घसरून अपघाताच्या घटना घडतात.
-----------------
...अन्यथा तीव्र आंदोलन
उन्हाळ्याच्या दिवसात या मार्गावर प्रवास करताना धुळीचा त्रास सहन करावा लागला.
पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर चिखल साचल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन या मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. पालखी मार्गाचे काम तातडीने सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना डॉ. अशोक ओळंबे, प्रा. अतुल पिलात्रे, रूपेश महल्ले उपस्थित होते.
-------------------------------
शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरू होते, अन् बंद पडते. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. खोदून ठेवलेला हा मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मुहूर्ताची वाट पाहू नका. दुर्दशा झालेल्या या चिखलमय मार्गाची बांधकाम विभागाने पाहणी करावी.
- नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर.
----------------
शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाचे काम १५ दिवसांत सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल. पालखी मार्गाचे काम बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे काम तातडीने सुरू करावे.
- संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, शिवसंग्राम.