शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात दिरंगाई; सुधीर कन्स्ट्रक्शन्सला १.८५ कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 01:53 PM2020-03-08T13:53:54+5:302020-03-08T13:54:02+5:30
१० फेब्रुवारीपर्यंत १०० दिवसांच्या विलंबापोटी कंत्राटदाराला १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात प्रचंड दिरंगाई केल्याचा कारणाने कंत्राटदार मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. नागपूर यांना विलंबासाठी प्रति दिवस १ लाख ८५ हजार रुपये दंड भरण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला. त्यानुसार १० फेब्रुवारीपर्यंत १०० दिवसांच्या विलंबापोटी कंत्राटदाराला १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, याच कंत्राटदाराकडे असलेली जिल्ह्यातील आणखीही दोन रस्त्यांची कामे संथ गतीने होत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंढरपूर-शेगाव रस्त्याच्या दुपदरीकरणासोबत दोन्ही बाजंूना पादचारी मार्ग तयार केला जात आहे. अकोला-वाशिम-बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील ८२ किमीचे काम निविदेतून नागपूर येथील मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. यांना मिळाले. ५ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यारंभ आदेशानुसार २४ महिन्यांत ते पूर्ण करण्याची मुदत आहे. काम पूर्णत्वाच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये २५.६२ टक्क्यांऐवजी १८ टक्केच पूर्ण झाले. त्यातच कंत्राटदार कंपनीने सप्टेंबर २०१९ पासून कामही जवळपास बंदच ठेवले. त्यामुळे या रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहेत. त्याचा दुचाकीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातूनच अपघाताची संख्याही वाढल्याची ओरड होत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदार सुधीर कन्स्ट्रक्शन यांना नोटीस देत दुसऱ्या माइलस्टोनपर्यंतच्या कामाला विलंब होत आहे. त्यासाठी २ नोव्हेंबर २०१९ या दिवसापासून विलंबासाठी दंडात्मक कारवाई सुरू केली.
१० फेब्रुवारी २०२० पर्यंत प्रत्येक दिवसासाठी १ लाख ८५ हजार ५०० रुपयेप्रमाणे हा दंड लावण्यात आला. करारनाम्यानुसार शंभर दिवसांच्या कालावधीसाठी १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे. कंत्राटदार कंपनीने काम थंडबस्त्यात ठेवल्याने ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या मुदतीत पूर्ण होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पालखी मार्गानुसार अकोला-वाशिम-बुलडाणा जिल्ह्यांतील रस्त्याचा समावेश असलेल्या शेगाव-नागझरी-पारस-निमकर्दा-गायगाव-अकोला-गोरेगाव-वाडेगाव-डव्हा-रिसोड-लोणी-बीबी किनगावजट्टू यादरम्यान ३७१ कोटी रुपये खर्चातून हे काम केले जात आहे.