शेख वसीम हत्या प्रकरण : 'बादल' ऐवजी 'वसीम'चा झाला गेम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:30 PM2020-05-06T18:30:28+5:302020-05-06T18:31:54+5:30
बादलची हत्या करण्यासाठी केवळ वसीमचा वापर करण्याचे ठरले होते; मात्र यासाठी वसीमने नकार दिला.
मूर्तिजापूर : २६ वर्षीय ट्रकचालकाच्या हत्येचा मूर्तिजापूर शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० तासातच छडा लावून आरोपी शेख रफिक शेख लतीफ (३२) याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
येथील देवरण रोड मोहम्मदिया प्लॉट परिसरातील शेतशिवारात खडकपुरा भागात राहणाऱ्या शेख वसीम शेख कलीम याची ४ मे च्या मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली. 'वसीम'हा घटनेच्या दिवशी रासायनिक खताने भरलेल्या ट्रकमध्ये झोपायला गेला होता; मात्र वसीमचा मित्र मो. राजीक मो. साबीर ऊर्फ 'बादल' याचा काटा काढण्यासाठी आरोपी शेख रफिक शेख लतीफ याने शिवणी येथे राहणारा लहान भाऊ अब्दुल अजीज अब्दुल लतीफ याला बोलावून घेतले होते. बादलची हत्या करण्यासाठी केवळ वसीमचा वापर करण्याचे ठरले होते; मात्र यासाठी वसीमने नकार दिला. त्यामुळे वसीम खुनाच्या कटाची इतरांना माहिती देईल, या भीतीने त्याचाच खून करण्यात आला.
विशेष म्हणजे बादल, वसीम व रफीक या त्रिकुटात कुठेतरी अनैतिक संबंध आड येत असल्याने बादलची हत्या करण्याचा अनेकदा डाव रचल्या गेल्याची चर्चा आहे; परंतु घटनेच्या दिवशी आरोपींनी बादलवर दिवसभर पाळत ठेवली; परंतु योग्यवेळी आरोपींच्या नजरेतून बादल निसटला. त्यामुळे आरोपींनी वसीमची त्याच्या ट्रकपासून काही अंतरावरच गळ्याला दुप्पटा आवळून व दगडाने ठेचून हत्या केली.
'रेवा' श्वानाने दिलेल्या संकेतावरून पोलिसांनी शेख रफिक शेख लतीफ याचा शोध सुरू केला असतानाच तो गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग सोनोरी दरम्यान त्याच्या मोबाइलचे लोकेशन आले होते. समोर बोरगाव पोलिसांनी नाकेबंदी केल्याने तो म्हैसांग मार्गाने अकोल्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी रफिकचा लहान भाऊ अब्दुल अजीज अब्दुल लतीफ हा फरार झाला आहे.
उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, शहर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलीस उप-निरीक्षक आशिष शिंदे, दीपक इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, उप-निरीक्षक सागर हटवार, पोहेकाँ गणेश पांडे, सुभाष अवचार, पोकॉं शक्ती कांबळे, संदीप काटकर, ओम देशमुख, चालक पोहेकॉं संजय निखाडे, शैलेंद्र ठाकरे व गणेश सोनोने आदींनी या गुन्ह्याचा छडा लावला.(शहर प्रतिनिधी)