एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचे पगार एक महिन्यापासून लटकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:32+5:302021-08-18T04:24:32+5:30

अकोला : कोरोना काळात एसटी महामंडळाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळात केवळ निधीअभावी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले ...

Shimga in Shravan of ST; Employees' salaries suspended for a month! | एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचे पगार एक महिन्यापासून लटकले!

एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचे पगार एक महिन्यापासून लटकले!

Next

अकोला : कोरोना काळात एसटी महामंडळाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळात केवळ निधीअभावी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या ताफ्यातील १,३००पेक्षा जास्त एसटी कर्मचारी सध्या हवालदिल झाले आहेत.

गत दीड वर्षापासून कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. आधीपासून अडचणीत असलेल्या महामंडळाला कोरोना काळात मोठा फटका बसला. अकोला विभागात ९० कोटींपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागला आहे. निर्बंध शिथिल झालेले असतानाही एसटीच्या फेऱ्यांना प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे डिझेल खर्चही निघणे कठीण झाले आहे. डिझेलवर होणाऱ्या खर्चामुळे एसटीला मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. यामुळे जुलैचा ७ ऑगस्ट रोजी होणारा पगार अजून झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्याही अडचणी वाढत आहेत.

आकडे काय सांगतात?

अधिकारी ०३

चालक ४४८

यांत्रिकी कर्मचारी ४५७

वाहक ४३८

प्रशासकीय अधिकारी ३१

उत्पन्न कमी; खर्च जास्त

जिल्ह्यात पाच आगार आहेत. या पाचही आगारात मिळून १२७च्या आसपास बसगाड्या आणि १ हजार ३००च्या जवळपास कर्मचारी आहेत.

साधारणत: प्रत्येक आगाराला सद्यस्थितीत दरदिवशी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. खर्चाचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे.

एखादे आगार सोडले तरी डिझेल, टायर, फिल्टर, ऑइलवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे वेतनासाठी रक्कम शिल्लक ठेवणेच कठीण होत आहे.

उसनवारी तरी किती करायची?

कोरोना संसर्गाच्या काळात आधीच अडचणीत वाढ झाली आहे. त्यात एसटी महामंडळाकडून जुलै महिन्याचा पगार अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे घरचा खर्च कसा चालवायचा, देणीघेणी कशी करायची, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

- एसटी कर्मचारी

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होत असतो. त्यानुसारच आमच्या खर्चाचे नियोजनही असते; परंतु आता १७ ऑगस्ट उलटली तरी आमच्या पगाराचा काही पत्ता नाही. मागील महिन्यात झालेल्या खर्चाची देणीघेणी, या महिन्याचे नियोजन कसे करायचे, घराचा खर्च कसा चालवायचा, असे प्रश्न आहेत.

- एसटी कर्मचारी

वेतन थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. कामगारांना १० तारखेपर्यंत वेतन देणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे, याकरिता संघटनेकडून मागणीही करण्यात आली आहे.

- रूपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना

Web Title: Shimga in Shravan of ST; Employees' salaries suspended for a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.