शिर्ला ग्रामपंचायत उभारणार कोविड केअर सेंटर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:24 AM2021-04-30T04:24:19+5:302021-04-30T04:24:19+5:30

शिर्ला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतीने रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टिकोनातून गावातच अद्ययावत कोविड केअर ...

Shirla Gram Panchayat to set up Kovid Care Center! | शिर्ला ग्रामपंचायत उभारणार कोविड केअर सेंटर!

शिर्ला ग्रामपंचायत उभारणार कोविड केअर सेंटर!

Next

शिर्ला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतीने रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टिकोनातून गावातच अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्याचा ठराव गुरुवारी ऑनलाइन मासिक सभेत घेतला. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. कोविड केअर सेंटर उभारणारी शिर्ला ग्रामपंचायत राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

जिल्ह्यात सर्वप्रथम शिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रात सात रुग्ण निघाले होते. त्यानंतर ही संख्या सहाशेवर पोहोचली होती. सातत्याने नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. सध्या ७५पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे गुरुवारी ऑनलाइन मासिक सभेमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य निर्भय पोहरे यांनी शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना तातडीने सुविधा मिळाव्यात यासाठी शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुसज्ज अद्यावत कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान यांनी अनुमोदन दिले आणि ग्रामपंचायत सरपंच अर्चना सुधाकर शिंदे, उपसरपंच कल्पना ज्ञानेश्वर खर्डे, ग्रामपंचायत सदस्य रेखाताई गवई, मनोहर पातुरे, सय्यद इरफान, सागर कढोणे, सुरेखा वसतकार, राजिक शाह, मंगल डोंगरे, वैशाली गावंडे, किरण येनकर, पूजा इंगळे यांनी सर्वानुमते ठरावाला मंजुरी दिली.

पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत १६ लाख ७१ हजार रुपये निधीची तरतूद ग्रामपंचायतीने कोविड केअर सेंटरसाठी केली आहे. सदर तरतूद कृती आराखड्यामध्ये नसल्यामुळे त्यासाठी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून आराखडा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी मृत्यूलासुद्धा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गावातच कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी विनंती सभेला केली. सर्वांनी त्याला मान्यता दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळत नाही. ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होऊ नये या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. राज्यातील हा पहिला प्रयोग असावा.

- अर्चना सुधाकर शिंदे, सरपंच, शिर्ला

सीईओंच्या निर्णयाची प्रतीक्षा

सभेने मांडलेला प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठरावाला मंजुरी दिल्यानंतरच कोविड केअर सेंटर अस्तित्वात आणणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी राहुल ऊंदरे यांनी दिली आहे.

शिर्ला ग्रामपंचायतीच्या सेवालाल भवन येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर प्रथमोपचारसह अत्याधुनिक बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.

Web Title: Shirla Gram Panchayat to set up Kovid Care Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.