स्वच्छतेसाठी शिरपूर ग्रामपंचायत सरसावली; गावभरात ठेवणार कचरापेट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 03:50 PM2019-08-01T15:50:34+5:302019-08-01T15:50:42+5:30
कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): जैनांची काशी आणि प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या शिरपूरला स्वच्छ ग्राम बनविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सरसावले आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाय केले जात असतानाच रस्त्यावर कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.
शिरपूर जैन ही वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहेच शिवाय प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि जैनांची काशी म्हणूनही देशभरात ओळखले जाणारे गावही आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे देशभरातील लाखो भाविकांचे येथे आवागमन सुरू असते. आता या तीर्थक्षेत्राचा आमुलाग्र विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत असून, देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथे कायम स्वच्छता राहावी म्हणून ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावभरात प्लास्टिकच्या कचरा पेट्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार पेठ, व्यापारी लाईन, धार्मिक स्थळे आदि ठिकाणी ५७ कचरापेट्या ग्रामपंचायतच्यावतीने ठेवल्या जाणार आहेत.
ओला कचरा, सुका कचºयाचे स्वतंत्र संकलन
गावात केवळ कचरापेट्या ठेवून स्वच्छता राखणे हाच ग्रामपंचायतचा उद्देश नसून, कचºयाची योग्य विल्हेवाट लावता यावी, कचरा विलगीकरणात अडथळा येऊ नये, तसेच भावी काळात कचरा प्रक्रियाही राबविता यावी म्हणून ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या कचरापेट्या ग्रामपंचायत ठिकठिकाणी ठेवणार आहे. यामुळे आपसूकच कचरा विलगीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.