शिवजयंती सप्ताहांतर्गत वेशभूषा अन् चित्रकला स्पर्धा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 02:59 PM2020-02-17T14:59:56+5:302020-02-17T15:00:18+5:30
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
अकोला : शिवजयंती सप्ताहांतर्गत रविवारी वेशभूषा, चित्रकला स्पर्धेसह विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले. वेशभूषा स्पर्धेनंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी पार्क येथून जय शिवराय जय जिजाऊ ,असा जयघोष करीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी शिवजयंती सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शिवजयंतीच्या या सोहळ्याची माहिती अकोलेकरांपर्यंत पोहोचावी, यासाठी रविवारी छत्रपती शिवाजी पार्क येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली रेल्वे स्टेशन चौक मार्गे अग्रसेन चौक, दुर्गा चौक, सिव्हिल लाइन मार्गे सहकार नगर येथील शिवस्मारक येथे पोहोचली. या ठिकाणी शिवस्मारकाला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शिवराय व जिजाऊंची वेशभूषा धारण केलेले स्पर्धक तसेच दोन शिव प्रचार रथ लक्षवेधी ठरले.
वेशभूषा स्पर्धा
वेशभूषा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून प्रथम येणाऱ्याला शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारण्याचा मान मिळणार आहे. स्पर्धेला परीक्षक म्हणून पूनम पारसकर व शरद कोकाटे उपस्थित होते.
शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आजपासून
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवार, १७ फेब्रुवारीपासून अकोट रोडस्थित छत्रपती शिवाजी पार्क येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. प्रदर्शनास अमळनेर येथील स्पार्क फाउंडेशनचे शस्त्र संग्राहक व इतिहास अभ्यासक पंकज दुसाने यांच्या संग्रहातील जवळपास ३०० शस्त्र प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
आरोग्य शिबिर व चित्रकला स्पर्धा
- महाआरोग्य तपासणी शिबिरात १०० मूकबधिर रुग्णांची तपासणी.
- जिल्ह्यातील १०० मूकबधिर समूहाला पालकमंत्री आ. बच्चू कडू संकल्पनेतून व सार्वजनिक शिवजयंती समितीतर्फे एक वर्षासाठी घेतले दत्तक.
- सहकार नगर येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.
- विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा पार पडली.