देयक काढण्यासाठी कंत्राटदाराला पैसे मागणा-या अभियंत्यास शिवसैनिकांनी दिला चोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:35 AM2017-12-06T01:35:49+5:302017-12-06T01:36:35+5:30
अकोला: कंत्राटदाराला देयक काढून देण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप करीत, जि.प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कंत्राटदाराला देयक काढून देण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप करीत, जि.प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
पातूर तालुक्यातील अक्षय कुळकर्णी या कंत्राटदाराला देयक काढण्यासाठी शाखा अभियंता किशोर राऊत हे पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला. याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांना मिळाली.
देशमुख यांनी, अभियंत्याच्या कार्यालयात जात, त्याला जाब विचारला. अभियंता किशोर राऊत यांनी आधी पैसे द्या नंतरच देयक काढतो, असे म्हटल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यासमोर अभियंता लाच मागत असल्याचे पाहून नितीन देशमुख यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिककांनी अभियंत्याला त्याच्याच कार्यालयात चांगलाच चोप दिला.
यासंदर्भात जि.प. सदस्य नितीन देशमुख यांनी शाखा अभियंता राऊत, उपअभियंता साकळकर यांची तक्रार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी अभियंता राऊत यांनी पैसे मागितल्याचे पुरावे देण्यास सांगितले आहे.
अभियंत्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येणार आहे. या प्रकरणात परस्परांनी एकमेकांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी दोघांच्या तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत.