शिवसंग्रामची पश्चिम वऱ्हाडात चाचपणी; मेटे घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:08 PM2019-08-02T12:08:21+5:302019-08-02T12:08:51+5:30
महायुतीमधील घटक पक्षही आपआपल्या तयारीत असून, शिवसंग्रामने पश्चिम वºहाडातील विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे
- राजेश शेगोकार
अकोला: लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी मिशन २२० प्लस हाती घेतले आहे. हे मिशन साध्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनादेश यात्राही सुरू केली असून, मित्रपक्षांना सोबत ठेवणार, अशी ग्वाही वेळोवेळी दिली आहे; मात्र राजकारणात ‘काहीही’ होऊ शकते, या उक्तीवर सर्वांचाच विश्वास असल्याने महायुतीमधील घटक पक्षही आपआपल्या तयारीत असून, शिवसंग्रामने पश्चिम वºहाडातील विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये अकोल्यातील बाळापूर व वाशिममधील रिसोड या मतदारसंघावर शिवसंग्रामचा दावा असला तरी सर्वच मतदारसंघात उमेदवारांच्या ताकदीचा धांडोळा घेण्यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे २ आॅगस्टपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामला गेल्या विधानसभेत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीड मध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले व बाळापुरात ऐनवेळी शिवसंग्रामऐवजी भाजपाला एबी फॉर्म मिळाला होता. दुसरीकडे मेटे यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवित पूर्ण चार वर्ष झुलवित ठेवले व नंतर शिवस्मारकाची जबाबदारी देत बोळवण केली. या पृष्ठभूमीवर शिवसंग्रामने आता पासूनच सावध पवित्रा घेतला आहे. विनायक मेटे हे राज्याच्या दौºयावर निघाले असून, त्या निमित्ताने युतीमधील प्रमुख पक्ष भाजपा, सेनेवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आहे. पश्चिम वºहाडातील बाळापूर व रिसोड या दोन मतदारसंघावर त्यांचे विशेष लक्ष असल्याने ते शुक्रवारी व शनिवार असे दोन दिवस अकोला, वाशिमसाठी देत आहेत. अकोल्यातील बाळापूर हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसंग्रामला मिळाला असतानाही स्थानिक नेतृत्वाच्या आग्रहापोटी या मतदारसंघात युतीमध्ये लढत देता आली नव्हती त्यामुळे यावेळी आतापासूनच या मतदासंघावर दावा करण्याची तयारी शिवसंग्रामने सुरू केली आहे. या मतदारसंघात शिवसेनाही कामाल लागली असून, त्यांनीही मतदारसंघावर दावेदारी केली आहे. भाजपा-सेना युतीमध्ये सेनेच्या वाट्याला सहज सोडता येईल असा बाळापूर हा एकच मतदारसंघ भाजपाकडे आहे. त्यामुळे सेना व शिवसंग्राम यापैकी कोणाला संधी द्यायची, असा गुंता भाजपा श्रेष्ठींपुढे होणार आहे. दुसरीकडे रिसोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक यांच्या प्राबल्याला खिंडार पाडण्यामध्ये भाजपाला सतात्याने अपयशच आले आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. २०१४ मध्ये सर्वत्र मोदी लाट असतानाही येथे काँग्रेसने विजय मिळवित झनक कुटुंबाचे वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे या मतदारसंघात मजबूत असलेला काँग्रेस पक्षाला खिंडार पाडण्यासाठी व नेहमीच अपयश आलेल्या भाजपाऐवजी मित्रपक्षाला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मिळावा यासाठी शिवसेनेसह शिवसंग्राम या दोन्ही मित्रपक्षांनी मतदारसंघासाठी वरिष्ठांकडे साकडे घातले आहे.
बाळापूर व रिसोड हे दोन्ही मतदारसंघ शिवसंग्रामला सहज मिळतील, अशी स्थिती नाही. मुळातच या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे इच्छुक उमेदवार हे प्रबळ दावेदार आहेतच, त्यामुळे शिवसेना व शिवसंग्राम या दोन्ही मित्रपक्षांची समजूत काढतातच भाजपासमोर निष्ठावंत इच्छुकांच्याही राजी-नाराजीचा प्रश्न उभा ठाकणार आहे.