मूर्तिजापुरात शिवसेनेचे आजपासून शेतकर्यांसाठी उपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:41 PM2017-11-27T19:41:39+5:302017-11-27T19:46:02+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
बिट बियाणे उत्पादक कंपन्यांनी तालुक्यातील शेतकर्यांची फसवणूक केली आहे. या बिटी कपाशीवर मोठय़ा प्रमाणात बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळवण्यासाठी व बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुका अप्पू तिडके यांनी केली होती. शेतकर्यांना सात दिवसात न्याय न दिल्यास २८ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अप्पू तिडके यांनी २१ नोव्हेंबर रोजी दिला होता. बोंडअळीग्रस्त शेतकर्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तिडके यांनी केला आहे. बोंडअळीग्रस्तांच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आठ शिवसैनिक बेमुदत उपोषण करणार आहेत. यामध्ये शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पू तिडके, मनोज जावरकर, अमोल सरप, स्वप्निल बोंडे, धनराज बोंडे, विजय सरोदे, शेखर मोरे, योगेश बोंडे यांचा समोवश आहे. या बेमुदत उपोषणास विविध पक्षांसह दहा संघटनांनी पाठिंबा दिला आहे.