शिवसेना सतर्क; ६ हजार बुथ प्रमुखांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:18 PM2019-08-17T15:18:43+5:302019-08-17T15:18:58+5:30
शिवसेनेने सर्कलनिहाय तब्बल ६ हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या.
अकोला: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विधानसभा निवडणुका डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने सर्कलनिहाय तब्बल ६ हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, सदर अहवाल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शुक्रवारी पक्षाकडे सादर केल्याची माहिती आहे.
आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा दावा-प्रतिदावा करणाºया भाजप व शिवसेनेमध्ये लोकसभा निवडणुकीत दिलजमाई झाल्याचे समोर आले. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल शिवसेना-भाजप युतीच्या पथ्यावर पडला. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी विधानसभा निवडणुकीला युतीच्या माध्यमातून सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, ही बाब गृहीत धरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे निर्देश संपर्क प्रमुखांसह जिल्हाप्रमुखांना दिले होते. शिवाय संघटना बांधणीचा वेळोवेळी घेतला जाणारा आढावा लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत युती होणार किंवा नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी मागील काही महिन्यांमध्ये जिल्हाभरात बुथ प्रमुख, जि.प. सर्कल प्रमुख, पं.स. सर्कल प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांच्या नियुक्तीचा सपाटा लावला होता. यामध्ये चार विधानसभा मतदारसंघात ६ हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती आहे. बुथ प्रमुखांचा अहवाल जिल्हाप्रमुख देशमुख यांनी शुक्रवारी मुंबई येथे पक्षाकडे सादर केला.
एक बुथ, पाच बुथ प्रमुख
जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने ६ हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. यापूर्वीच्या एक बुथ एक कार्यकर्ता या समीकरणाला फाटा देत जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी एका बुथसाठी पाच बुथ प्रमुखांची नियुक्ती केली. बुथ प्रमुखांसह विभाग प्रमुखांवर मतदारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्र्यांची करडी नजर
शिवसेनेचे केंद्रीय मंत्री तथा पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांची पक्ष संघटनेवर करडी नजर असल्याचे बोलल्या जाते. २०१६ मध्ये संपर्क प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच अरविंद सावंत यांनी पक्ष बांधणीला महत्त्व दिल्याचे दिसून येते. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सर्कल प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यासोबतच बुथ प्रमुखांच्या नियुक्त्यांना प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे.