शिवसेनेचे नगरसेवक नादुरुस्त लाेटगाडी घेऊन शिरले मनपा सभागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:44 AM2021-06-15T10:44:03+5:302021-06-15T10:44:27+5:30
Shiv Seana Agitation at Akola : शिवसेनेच्यावतीने साेमवारी सभागृहात नादुरुस्त लाेटगाडी सजवून आणून अनाेखे आंदाेलन करण्यात आले.
अकाेला : मनपात आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याकाठी २ काेटी रुपये खर्च हाेतात. परंतु अरुंद गल्ली-बाेळांत स्वच्छतेची कामे करण्यासाठी लाेटगाड्यांची आवश्यकता भासत असताना, त्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्याची टीका करीत शिवसेनेच्यावतीने साेमवारी सभागृहात नादुरुस्त लाेटगाडी सजवून आणून अनाेखे आंदाेलन करण्यात आले. सत्ताधारी भाजप व प्रशासनाने ही समस्या निकाली काढण्याची मागणी सेनेतर्फे करण्यात आली. शहरातील दाट लाेकवस्ती असलेल्या भागात केवळ अडीच ते तीन फूट रुंद सर्विस लाईन आहेत. स्लम एरियामध्ये नागरिकांच्या घरासमाेरून नाल्या वाहतात. अरुंद गल्ली-बाेळांत स्वच्छतेची कामे करताना सफाई कर्मचाऱ्यांना केरकचरा व साचलेली घाण खांद्यावरून वाहून आणावी लागते. ही बाब पाहता, अशा गल्ली-बाेळांतील कामांसाठी लाेटगाड्यांची व्यवस्था केली आहे. मनपाच्या वेल्डींग कारखान्यात अशा गाड्या तयार हाेऊन त्यांची दुरुस्ती केली जाते. परंतु मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडून लाेटगाड्या उपलब्ध केल्या जात नसून नादुरुस्त गाड्यांची दुरुस्तीही ठप्प झाली आहे. त्यामुळे गल्ली-बाेळांत काम करण्यास सफाई कर्मचाऱ्यांनी आखडता हात घेतला आहे. यासंदर्भात प्रशासन व सत्तापक्षाकडे वारंवार विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याचा आराेप करीत साेमवारी सेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात नादुरुस्त लाेटगाडी सजवून खांद्यावरून सभागृहात आणण्यात आली. यावेळी सेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित हाेते.
महापाैरांनी दिले निर्देश
सेनेच्या अनाेख्या आंदाेलनाची दखल घेत महापाैर अर्चना मसने यांनी लाेटगाड्यांची दुरुस्ती करून नगरसेवकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्त नीमा अराेरा यांना दिले.