शिवसैनिकांची विदर्भवाद्यांना धक्काबुक्की
By admin | Published: May 1, 2017 08:08 PM2017-05-01T20:08:18+5:302017-05-01T20:51:46+5:30
अकोला:महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत वेगळ््या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवाद्यांच्या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रचंड धुडगूस घालून आंदोलन उधळून लावले.
विदर्भवाद्यांचे आंदोलन शिवसैनिकांनी उधळले;पोलिसांची धाव
अकोला:महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत वेगळ््या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवाद्यांच्या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रचंड धुडगूस घालून आंदोलन उधळून लावले. स्थानिक मदनलाल धिंग्रा चौकात ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून वेगळ््या विदर्भाचे नारे देणाऱ्या विदर्भवाद्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की करत विदर्भाच्या झेंड्याची होळी केल्याचा प्रकार सोमवारी घडला. सिटी क ोतवाली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे चित्र पहावयास मिळाले.
राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना शहरातील विदर्भवाद्यांनी वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलन केले. विदर्भवादी अविनाश नाकट यांनी ब्रिजलाल बियाणी यांच्या पुतळ््याला पुष्पहार घातला. यावेळी धनंजय मिश्रा, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, ललित बहाळे, डॉ.निलेश पाटील व उपस्थित कार्यकर्ते वेगळ््या विदर्भाची नारेबाजी करत असताना या आंदोलनाची कुणकूण लागलेल्या शिवसैनिकांनी धिंग्रा चौकात धाव घेतली. शिवसेना निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, अश्वीन नवले, तरूण बगेरे, योगेश गिते, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, दिनेश सरोदे, राहूल कराळे, अश्विन पांडे, कालू गायकवाड, संतोष रणपिसे, बाळापूर तालुका प्रमुख संजय शेळके, रूपेश ढोरे, संजय भांबेरे, योगेश बकाल, प्रकाश वानखडे, संजय अग्रवाल, चेतन मारवाल, देवा गावंडे, सुरेश इंगळे, बंटी पाटील, मनोज बावीस्कर, रवी सातपुते, मुन्ना भाकरे, बालू चव्हाण, प्रमोद मराठे आदि शिवसैनिक व विदर्भवाद्यांनी परस्पर विरोधी घोषणा देणे सुरु केल्यानंतर अचानक शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांना धक्काबुक्की सुरु केली. विदर्भवाद्यांच्या हातामधील फलक व झेंडा हिसकावून घेत शिवसैनिकांनी त्याची होळी केली. या प्रकाराची माहिती मिळताच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना विलंब झाला असता तर परिस्थिती चिघळण्याची दाट चिन्हं होती.
आॅटोमध्ये केले रवाना!
सिटी कोतवाली पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांची उपलब्ध वाहने व कार्यकर्त्यांची संख्या पाहता काही विदर्भवाद्यांना चक्क आॅटोत बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी पोलिस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
अंगावर फेकली माती!
मदनलाल धिंग्रा चौकात विदर्भवादी व शिवसैनिकांमध्ये तब्बल अर्धा तास घोषणाबाजी सुरु होती. यावेळी काही शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांच्या अंगावर माती फेकली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली.