शिवसेना सदस्यांचा कृषी विकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:51 AM2020-12-04T04:51:44+5:302020-12-04T04:51:44+5:30
अकोला: कपाशी बीटी बियाणे अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी करीत, शिवसेनेच्या जिल्हा परिषद ...
अकोला: कपाशी बीटी बियाणे अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी करीत, शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या दिला.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ९० टक्के अनुदानावर बीटी कपाशी बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे; परंतु कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला असला तरी, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे बियाणे अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी करीत शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी कृषी विकास अधिकारी कक्षात ठिय्या दिला. या मुद्द्यावर शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्यासोबत चर्चा केली. योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठ दिवसात बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन कृषी विकास अधिकारी डॉ. इंगळे यांनी दिल्यानंतर शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. ठिया आंदोलनात जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर, सदस्य अप्पू तिडके, गोपाल भटकर, संदीप सरदार, संजय अढाऊ, डॉ. प्रशांत अढाऊ, शिवसेना शहर प्रमुख अतुल पवनीकर, राहुल कराळे , अभय खुमकर, सुरेश गोरे ,बंडू राऊत , पंकज पवार , गजानन वजीरे, राजेंद्र मोरे ,योगेश अग्रवाल , रामेश्वर तायडे, विशाल कपले, सोनू भटकर आदी सहभागी झाले होते.
९ हजारपैकी १८३ लाभार्थींच्या
खात्यात अनुदानाची रक्कम!
कपाशी बियाणे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यात ९ हजार लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ १८३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. २ हजार ८०० शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार असून, आठ दिवसात सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन कृषी विकास अधिकाऱ्यांनी शिवसेना सदस्यांना यावेळी दिले.
.….......फोटो........