शिवसेनेने वाजविले ‘ढोल’
By admin | Published: July 11, 2017 01:30 AM2017-07-11T01:30:19+5:302017-07-11T01:35:33+5:30
घरकुलांसाठी मनपावर मोर्चा : शिवसेनेच्या आंदोलनामुळे गाजला सोमवार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विनाअट त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासोबतच संबंधित शेतकऱ्यांची यादी तातडीने प्रसिद्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले. त्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे निकष व अटी शिथिल करून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेवर मोर्चा काढला. एकूणच, शिवसेनेच्या आंदोलनांमुळे सोमवारचा दिवस ढवळून निघाला. दोन्ही मोर्चादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्यावतीने शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळावी, यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीच्या विषयावरून आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपाने जाहीर केलेली शेतकऱ्यांची यादी व जिल्हा बँकांकडील यादीत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने बँकांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलनाचे हत्यार उपसले. बँकांसमोर आंदोलन करण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रत्येक तालुक्यातून दिंडी व भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. दीड लाखांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेचे १९ हजार ८५३ शेतकरी पात्र ठरले असून, त्यांचे ७ कोटी रुपये माफ होतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन सोपविण्यात आले.
बँक अधिकारी म्हणाले, आदेश नाहीत!
ल्ल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी सन २००९ पासून थकबाकीदार असलेल्या सभासदांना पात्र ठरविण्यासंदर्भातील शासन निर्णय अद्यापही मिळाला नसल्याचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना सांगितले. शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी स्पष्टीकरण अनंत वैद्य यांनी शिवसैनिकांना दिले.
अशा आहेत मागण्या
- कर्जमाफीसठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी सादर करा
- कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना विनाअट पीक कर्ज उपलब्ध करून द्या.
- शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली तत्काळ थांबवा.
- बँकेमार्फत पीक कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करा
- पीक कर्जाव्यतिरिक्त शेतकऱ्यांकडे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांची यादी द्या.