शिवसेनेचे मनपा अधिकाऱ्यांवर दबावतंत्र; धाकापोटी अधिकारी भूमिगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:05 AM2019-08-21T10:05:07+5:302019-08-21T10:05:25+5:30
मंगळवारी महापालिकेत घडलेल्या प्रकारालाही भाजप-सेनेतील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजुरीसाठी विलंब होत असल्याची सबब पुढे करीत मंगळवारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह काही पदाधिकारी व नगरसेवकांनी महापालिकेत दाखल होत नगररचना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची शोधमोहीम राबविली. ही माहिती मिळताच घाबरलेले अधिकारी मनपातून भूमिगत झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे मनपाच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिकेचा नगररचना विभाग मागील काही दिवसांपासून प्रकाशझोतात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना नकाशा मंजुरीसाठी मनपात हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दर बुधवारी नगररचना विभागाच्या माध्यमातून प्रलंबित नकाशांना विनाविलंब मंजुरी देण्याचे धोरण आखले. हा प्रयोग सुरू असतानाच कालांतराने घरांचे नकाशे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आणि उच्चभू्र नागरिक, खासगी शिकवणी संचालक तसेच बड्या बिल्डरांच्या नकाशांना मंजुरी देण्यात येऊ लागली. यादरम्यान, शहरातील गुंठेवारी प्रकरणांना नियमबाह्यरीत्या मंजुरी दिली जात असल्याप्रकरणी थेट राज्य शासनाने सखोल चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुषंगाने मनपाचा नगररचना विभाग कामाला लागल्याची माहिती आहे. एकूणच, शहरातील अवैध बांधकामे, नियमबाह्यरीत्या मंजूर करण्यात आलेले गुंठेवारीचे नकाशे, ले-आउटमधील खुल्या जागा हडपण्याच्या प्रकरणात भविष्यात मोठे वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामागे सत्ताधारी भाजप व शिवसेनेतील काही नेत्यांच्या अंतर्गत कलहाची किनार असल्याचे बोलल्या जात आहे. मंगळवारी महापालिकेत घडलेल्या प्रकारालाही भाजप-सेनेतील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. आगामी दिवसांत मनपा आयुक्त संजय कापडणीस या परिस्थितीला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले.
निर्णय घेऊन सोक्षमोक्ष लावा!
नगररचना विभाग ले-आउट, नकाशा मंजूर करताना किंवा बांधकामाच्या विविध परवांगी देताना अकोलेकरांना झुलवत ठेवत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार शिवसेनेचे काही नेते व पदाधिकाºयांच्या बाबतीत ले-आउट व नकाशा मंजुरीबाबत होत असल्याने संतप्त झालेले पदाधिकारी, सेनेचे नगरसेवक व काही नगरसेविका पतींनी मनपात धाव घेऊन नगररचना विभागातील काही अधिकाºयांची शोधमोहीम राबविली. मनपाने प्रलंबित प्रकरणांचा सोक्षमोक्ष न लावल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संबंधित सेना पदाधिकाºयांनी दिल्याची माहिती आहे.
महापौरांच्या दालनात मॅरेथॉन बैठक
मंगळवारी मनपातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळातील वातावरण पूर्णत: ढवळून निघाल्याचे चित्र होते. दुपारी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात आमदार रणधीर सावरकर, आयुक्त संजय कापडणीस यांची बैठक सुरू होती. यादरम्यान शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया मनपात दाखल झाले. संबंधितांमध्ये सुमारे तीन ते चार तास चर्चा झाल्याची माहिती आहे.