शिवसेनेत बंडाचे निशाण फडकविणाऱ्यांची उचलबांगडी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:35 PM2019-10-30T14:35:23+5:302019-10-30T14:35:54+5:30
नितीन देशमुख यांच्या विरोधात काही पदाधिकाºयांनी छुप्या पद्धतीने तर काहींनी उघडपणे प्रचार केल्याची बाब पक्षाच्या निदर्शनास आली आहे.
- आशिष गावंडे
अकोला: जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ बाळापूर शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याचे ध्यानात येताच सेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. इथपर्यंतच न थांबता बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेचा पराभव अटळ असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालत त्यांची दिशाभूल करण्यात आली होती. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची दिशाभूल करणे, उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणे आदी बाबी लक्षात घेता संबंधित पदाधिकाºयांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणी पडद्याआडून खेळी करणाºयांवरही आघात होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उपरती लागली. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक पद्धतीने आंदोलने करून प्रशासकीय यंत्रणेला निर्णय बदलण्यास भाग पाडणाºया शिवसेनेची पिछेहाट झाली. या कालावधीत सेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या मानसिक जाचाला कंटाळून अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी भाजप तसेच राष्ट्रवादी पक्षाची वाट धरली. स्थानिक पदाधिकाºयांमधील वादाला खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन संपर्क प्रमुखांनी केल्याचे बोलल्या जाते. ही बाब मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या ध्यानात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यावर उपाय म्हणून सप्टेंबर २०१६ मध्ये पश्चिम विदर्भाच्या संपर्क प्रमुख पदाची सूत्रे अरविंद सावंत यांच्याकडे देण्यात आली. तेव्हापासूनच गलितगात्र झालेल्या पक्षाला बळ मिळाले. नव्याने गठित केलेल्या जिल्हा कार्यकारिणीने गावागावांमध्ये शाखा निर्माण केल्याचे सकारात्मक परिणाम समोर येताच ज्यांचे पक्ष बांधणीत कवडीचे योेगदान नाही, अशा नामधारी पदाधिकाºयांच्या अपेक्षांना धुमारे फुटले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला केवळ बाळापूर मतदारसंघ सुटणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर १६ आॅगस्ट रोजी स्थानिक पदाधिकाºयांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या बैठकीत सेना पदाधिकाºयांनी अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिम यापैकी एक तसेच ग्रामीण भागातील अकोट व बाळापूर मतदारसंघाची मागणी रेटून धरली होती, हे विशेष.
तूर्तास फेरबदल नाहीच!
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख बाळापूर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर काहींना जिल्हाप्रमुख पदाचे डोहाळे लागले आहेत. काही माजी पदाधिकारी या पदासाठी आग्रही असले तरी तूर्तास बंडाचे निशाण फडकावणाºयांची उचलबांगडी केल्यानंतर जिल्हा कार्यकारिणीत कोणतेही मोठे फेरबदल होणार नसल्याची माहिती आहे. पडद्याआडून खेळी करणाºयांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
उमेदवाराच्या विरोधात प्रचार
बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या विरोधात काही पदाधिकाºयांनी छुप्या पद्धतीने तर काहींनी उघडपणे प्रचार केल्याची बाब पक्षाच्या निदर्शनास आली आहे. यामध्ये महिला पदाधिकाºयांचाही समावेश होता. ज्या पदाधिकाºयांनी प्रचारात सहभाग घेतला त्यांना दमदाटी करून अपमान करण्यात आल्याची माहिती आहे.