पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचे मोबाइल टॉवरवर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:10 PM2020-09-05T12:10:37+5:302020-09-05T12:10:50+5:30
शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्वीन नवले यांच्यासह संदीप बोरसे, करण घाटे, महादेव श्रीनाथ, सतीश देशमुख, संदीप महल्ले यांनी शुक्रवारी मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेना वसाहतमध्ये गत दोन वर्षांपासून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन खोदून ठेवली असली तरी अद्यापही सदर काम अर्धवट स्थितीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्वीन नवले यांच्यासह संदीप बोरसे, करण घाटे, महादेव श्रीनाथ, सतीश देशमुख, संदीप महल्ले यांनी शुक्रवारी मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
‘अमृत’ अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ पाणीपुरवठयासाठी जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. प्रभागातील गीता नगर व इतर भागात जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी शिवसेना वसाहतमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले काम अद्यापही निकाली निघाले नसल्याची परिस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने जलवाहिनीसाठी ठिकठिकाणी रस्त्याचे खोदकाम करून ठेवले असून, अद्यापही जलवाहिनीचे जाळे टाकले नाही. योजनेचे काम निकषानुसार होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. जलवाहिनीचे काम निकषानुसार आणि तातडीने निकाली काढण्याची मागणी करीत प्रभागाच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्विन नवले यांच्यासह शिवसैनिकांनी शुक्रवारी शोले स्टाइल आंदोलन करीत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जलवाहिनीच्या कामासंदर्भात मनपाने लेखी आश्वासन द्यावे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक गजानन चव्हाण यांनी उपस्थित उपायुक्त वैभव आवारे यांच्यासोबत शिष्टाई केल्यानंतर प्रशासनाने लेखी हमी दिली.