पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती
By राजेश शेगोकार | Published: January 11, 2023 01:16 PM2023-01-11T13:16:26+5:302023-01-11T13:21:37+5:30
अमरावती विभागीय मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या कोट्यात काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा शोध अखेर संपला आहे. शिवसेना बुलढाण्याचे माजी जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे हे आता काँग्रेसच्यावतीने लढणार आहेत.
अमरावती विभागीय मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या कोट्यात काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसकडून डॉ. सुनिल देशमुख, डॉ. सुधीर ढोणे, मिलिंद चिमोटे अशा नावांची चाचपणी केली. उमेदवार ठरविण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून काथ्याकुट सुरू असून अखेर काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतून उमेदवार आयात केला आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेने दीड वर्ष आधीच तयारी सुरू केली हाेती. शिवेसनेचे नेते अनिल देसाई यांनी या मतदारसंघासाठी पदवीधर मतदार नोंदणी, बैठका अशी सर्व जबाबदारी धिरज लिंगाडे यांच्याकडे देत लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार असतील असे संकेत दिले होते. राज्यातील सत्तांतरानंतरही लिंगाडे हे ठाकरे गटासोबत कायम राहिले मात्र अमरावतीची जागा काँग्रेसकडे असल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार काँग्रेसच्या कोट्यात दिला आहे.
काँग्रेसने उमेदवारीचा घोळ का घातला?
विधान परिषदेच्या अमरावती विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार ५ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असतानाही महाविकास आघाडीमध्ये उमेदवार ठरविण्याबाबत गोंधळ कायम होता. अमरावती मुंबई, नागपुर असे बैठकांचे सत्रा झाल्यावरही उमेदवार ठरत नव्हता. दरम्यान राष्ट्रवादी व शिवसेनेत या उमेदवारीबाबत बाेलणे झाल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिले होते. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवार कॉंग्रेसकडे घेण्याचे आधीच ठरले असावे म्हणून काँग्रेसने उमेदवारीचा घोळ सुरू ठेवल्याची चर्चा आहे.
मी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्ज दाखल करणार असलो तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत समन्वय आहे. - धीरज लिंगाडे