कापूस, सोयाबीनच्या हमीभावासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा; आमदार नितीन देशमुख यांची माहिती

By आशीष गावंडे | Published: February 9, 2024 08:07 PM2024-02-09T20:07:27+5:302024-02-09T20:08:41+5:30

शेतकऱ्यांनी काबाड कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची असते.

Shiv Sena's Farmer Sangharsh Yatra for guaranteed price of cotton, soybeans Information of MLA Nitin Deshmukh | कापूस, सोयाबीनच्या हमीभावासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा; आमदार नितीन देशमुख यांची माहिती

कापूस, सोयाबीनच्या हमीभावासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा; आमदार नितीन देशमुख यांची माहिती

अकोला: धर्माच्या तसेच जातीपातीच्या आडून राजकारण करण्यापेक्षा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सोयाबीन व कापसाच्या हमीभावावर ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या वेदना व समस्या जाणून घेण्यासाठी शासनकर्ते सपशेल कुचकामी ठरल्यामुळेच शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने १५ फेब्रुवारीपासून जिल्हाभरात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

निसर्गाने कितीही अवकृपा केली तरीही शेतकरी हार मानत नाही. शेतकऱ्यांनी काबाड कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची असते; परंतु शासनकर्त्यांकडूनच शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपाच्या अनेक  मोठ्या नेत्यांनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांना हमीभाव मिळावा यासाठी कापूस दिंडी काढली होती. त्यावेळी सोयाबीनला सहा हजार रुपये व कापसाला आठ हजार रुपये दर मिळावा अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. आजरोजी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, असे असतानाही सोयाबीन व कापसाला हमीभाव का मिळत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढली जात असल्याची माहिती आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिली. संघर्ष यात्रेदरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार दाळू गुरुजी, मा. आमदार हरिदास भदे, मा. आमदार संजय गावंडे, सेवकराम ताथोड शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील. पत्रकार परिषदेला वरिष्ठ नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मंगेश काळे, ज्ञानेश्वर म्हैसणे, योगेश्वर वानखडे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, संजय शेळके,शहर प्रमुख अकोला पूर्व राहुल कराळे, आनंद बनचरे ,निरंजन बंड, नितीन ताथोड आदि उपस्थित होते. 

जिल्ह्यात ५०० किलोमीटरचा पायी प्रवास
शिवसेनेच्या पायदळ शेतकरी संघर्ष यात्रेला १५ फेब्रुवारीपासून मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरा येथील गाडगे बाबा संस्थान मधून प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात ५०० किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर २ मार्च २०२४ रोजी शहराचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिर भागात यात्रेचा समारोप केला जाणार आहे. 

शेतांमध्ये करणार मुक्काम
शेतमालाला शासन हमीभाव देत  नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही ३०० पेक्षा अधिक गावांना भेटी देणार असून यादरम्यान शेतांमध्येच मुक्काम करणार असल्याची माहिती नितीन देशमुख यांनी दिली.

Web Title: Shiv Sena's Farmer Sangharsh Yatra for guaranteed price of cotton, soybeans Information of MLA Nitin Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.