बुथ प्रमुखांच्या नियुक्तीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 07:07 PM2018-09-09T19:07:33+5:302018-09-09T19:07:42+5:30

 Shiv Sena's front line for appointment of Booth Chief | बुथ प्रमुखांच्या नियुक्तीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

बुथ प्रमुखांच्या नियुक्तीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

Next

- आशिष गावंडे

अकोला: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात ठेवून सर्कलनिहाय बुथ प्रमुखांच्या नियुक्तीसाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. आजवर कागदोपत्री नियुक्ती असणाऱ्या जि.प. तथा पंचायत समिती सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुखांपासून ते थेट विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांपर्यंतचा ‘बॅकलॉग’ भरून काढताना शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची चांगलीच दमछाक होत असल्याची माहिती आहे. निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शिवसैनिकांच्या होणाºया नियुक्त्या मतांचा अनुशेष भरून काढतील का, याकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्रासह राज्यात भाजपासोबत सत्तास्थानी असणाºया शिवसेनेमुळे भाजपाची कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे. कर्जमाफी तसेच सोयाबीन, तूर, हरभरा खरेदीच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजप विरोधात रान पेटविले आहे. आगामी जिल्हा परिषद, लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना कामाला लावले आहे. पश्चिम विदर्भाची धुरा सांभाळणारे शिवसेना संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत यांनी जिल्हा पातळीवर पक्षाची पुनर्रचना करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. खा. सावंत यांनी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल केल्यानंतर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना संघटन बांधणीचे निर्देश दिले. पक्षातील जुन्या जाणत्या व निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेऊन जिल्हाप्रमुख देशमुख यांनी जि.प. तसेच पंचायत समिती सर्कल प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. ग्रामीण भागात ठिकठिकाणी सेनेच्या शाखा उघडण्यात आल्याचे चित्र दिसून आले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या करून त्यांच्यासह विभाग प्रमुखांवर मतदारांची जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. ‘बुथ प्रमुख’ या पदावर नियुक्त करण्यासाठी जबाबदार तसेच विश्वासू शिवसैनिकांचा शोध घेताना जिल्हा कार्यकारिणीची दमछाक होत असल्याची माहिती आहे.

मतदारांची संख्या होणार निश्चित!
जिल्हापातळीवर विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या झाल्या असून, उपशाखा प्रमुख, बुथ प्रमुख व गटप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. यंदा प्रथमच एका उपशाखा प्रमुखाला किमान दोनशे ते अडीचशे मतदारांची जबाबदारी सोपविल्या जाणार आहे. सेनेचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.


ग्रामीण भागात भाजप, भारिपचे आव्हान!
यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये बुथ प्रमुख पदाची रचना भाजपासाठी यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात भाजपाने बुथ प्रमुख व विस्तारकांचे मजबूत जाळे विणल्याचे बोलल्या जाते. त्यापाठोपाठ भारिप-बहुजन महासंघाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे. बुथ प्रमुखांचा शोध घेऊन त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवताना शिवसेनेसमोर या दोन्ही बलाढ्य राजकीय पक्षांचे आव्हान उभे ठाकले आहे.

 


 

 

Web Title:  Shiv Sena's front line for appointment of Booth Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.